सासूबाईंची सेवा करतांना साधिका सौ. चारूलता नखाते यांचा झालेला संघर्ष आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे सर्व स्तरांवर झालेले पालट

श्रीमती लक्ष्मी महादेव नखाते (वय ८५ वर्षे) यांची (सासूबाईंची) सेवा करतांना साधिका सौ. चारूलता नखाते यांचा झालेला संघर्ष आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे सर्व स्तरांवर झालेले पालट

‘माझ्या सासूबाई श्रीमती लक्ष्मी महादेव नखाते (वय ८५ वर्षे) वृद्धापकाळाने रुग्णाईत असल्याने मला त्यांची सेवा करावी लागते. वर्ष २०१९ मध्ये माझे स्वभावदोष आणि माझ्या मनातील अयोग्य विचार यांमुळे मला सासूबाईंच्या सेवेचा लाभ करून घेता येत नव्हता. मी एका सेवेच्या निमित्ताने सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना संपर्क केला असता त्यांना माझ्या मनातील संघर्षाचे प्रसंग सांगितले. त्यानंतर त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे मला त्या त्या प्रसंगांमधून बाहेर पडता आले. हे प्रसंग आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी दिलेले दृष्टीकोन येथे दिले आहेत.

१. सासूबाईंच्या सेवेसंदर्भात घडलेले प्रसंग आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी दिलेले दृष्टीकोन

श्री. भारत नखाते

१ अ. यजमानांनी आईची सेवा करण्यास सांगितल्यावर कर्तेपणाचे विचार येऊन मनाचा संघर्ष होणे आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे भाव ठेवून सेवा केल्यावर सेवा अल्प वेळेत अन् सहजतेने होणे : एकदा मला यजमानांनी (श्री. भारत नखाते, आध्यात्मिक पातळी ६० टक्के यांनी) ‘आईला अंघोळ घाल आणि तिच्या केसांना तेल लावून केस विंचर’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनात ‘हे तर मी प्रतिदिनच करते’, असा कर्तेपणाचा विचार आला आणि मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे माझा अहं वाढून मी अस्वस्थ झाले आणि माझ्या मनाचा संघर्ष होऊ लागला. हा प्रसंग मी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना सांगितला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सासूबाईंची सेवा करतांना ‘मी संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवून श्रद्धापूर्वक सेवा केली पाहिजे. ‘मला येते. मी करते’, असे विचार असतील, तर सेवेतून आनंद कसा मिळणार ?’’ हे ऐकून माझा भाव दाटून आला आणि मी सद्गुरु अनुराधाताईंनाच कळकळीची प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझ्याकडून ही संतसेवा करवून घ्या.’ त्यानंतर मी भाव ठेवून सेवा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘ती सेवा माझ्याकडून अल्प वेळेत आणि सहजतेने होत आहे’, असे मला अनुभवायला मिळाले.

१ आ. सासूबाईंच्या आवडीचा स्वयंपाक करूनही यजमानांनी आणखी एक पदार्थ करण्यास सांगितल्यावर ते स्वीकारता न येणे आणि सद्गुरु अनुराधाताईंनी ‘तुम्ही स्वेच्छा सोडायला हवी’, असे म्हटल्यावर चूक लक्षात येणे : एक दिवस मी सासूबाईंच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. तेव्हा यजमान मला म्हणाले, ‘‘आईच्या आवडीचा आणखी एखादा पदार्थही कर.’’ त्यावर मी रागाने त्यांना म्हणाले, ‘‘आता मी केलेला स्वयंपाक शिल्लक राहील !’’ त्या वेळी ‘यजमानांनी सासूबाईंच्या समोर मला कशाला असे सांगायचे ?’, असा विचार येऊन माझ्या मनाचा संघर्ष झाला. मी हा प्रसंग सद्गुरु अनुराधाताईंना सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही स्वेच्छा सोडायला हवी.’’ त्या वेळी मला ‘मी परेच्छेने कृती करण्याची संधी घालवली’, याची जाणीव झाली आणि माझी चूक लक्षात आली.

सौ. चारूलता नखाते

१ इ. सासूबाईंनी पहाटे उठून चूर्ण आणि गरम पाणी मागितल्यावर चिडचिड होणे अन् सद्गुरु अनुराधाताईंनी यावर उपाययोजना काढण्यास सांगितल्यावर मनात सकारात्मक विचार येऊन उपाय सुचणे : सासूबाई पहाटे उठून मला सांगायच्या, ‘‘माझे पोट दुखते. पोट साफ होत नाही. मला चूर्ण दे.’’ (त्यांना गरम पाण्यासह चूर्ण द्यावे लागायचे.) तेव्हा मी त्यांना समजावून सांगत असे, ‘‘अजून पहाट झाली नाही. मी तुम्हाला नंतर चूर्ण देते.’’ तेव्हा माझी चिडचिड व्हायची. सद्गुरु अनुराधाताईंना हा प्रसंग सांगितल्यानंतर त्यांनी ‘काहीतरी उपाययोजना काढा’, असे सांगितले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण रात्री थर्मासमध्ये गरम पाणी भरून ठेवू शकतो आणि सकाळी सासूबाईंना त्या पाण्यासह चूर्ण देऊ शकतो.’ सद्गुरु अनुराधाताईंशी बोलल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येऊ लागले. त्यांच्या चैतन्यामुळे माझ्याकडून योग्य कृती होऊ लागली.

२. सद्गुरु अनुराधाताईंनी दिलेल्या योग्य दृष्टीकोनांमुळे नकारात्मक विचार न्यून होऊन साधिकेच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागणे अन् घरातील वातावरणही चांगले होणे

वरील सर्व प्रसंगांत यजमानांनी सासूबाईंच्या सेवेसंदर्भात काही सांगितले की, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझी चिडचिड होत असे. त्यामुळे घरातील वातावरण चांगले रहात नसे. प्रत्येक वेळी सद्गुरु अनुराधाताईंनी योग्य दृष्टीकोन दिल्यामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू न्यून होऊन सकारात्मक विचार येऊ लागले. त्यांच्यातील चैतन्यामुळे माझ्याकडून योग्य कृती होऊ लागल्या. माझ्यात आणि यजमानांमध्ये होणारे वादही उणावले अन् घरातील वातावरण चांगले होऊ लागले. या सर्वांचा सकारात्मक परिणाम सासूबाईंवरही झाल्याचे जाणवू लागले. या वर्षी सासूबाई घरी आल्यानंतर त्यांच्यात अनेक चांगले पालट झाल्याचे माझ्या लक्षात आले.

३. सासूबाईंमध्ये झालेले सकारात्मक पालट

श्रीमती लक्ष्मी नखाते

अ. सासूबाई काही दिवस आमच्याकडे आणि काही दिवस दिरांकडे रहातात. त्या म्हणतात, ‘‘मला या घरात रहायला आवडते; कारण येथे श्रीकृष्ण आहे.’’

आ. सासूबाई आमच्या घरी आल्यानंतर ‘त्यांचा सतत नामजप होत आहे’, असे लक्षात आले. त्यांना नामजपाची आठवण केल्यावर त्या उठून श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजप करतात. त्या काही खाण्याआधी श्रीकृष्णाला हाक मारून ‘तुम्ही जेवायला या’, असे सांगतात.

इ. सासूबाईंना वाचता येत नाही, तरीही त्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक हातात घेऊन त्याचे प्रत्येक पान चाळतात. त्यातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पहातात आणि भिंतीवरील श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघून ‘हेच ते श्रीकृष्ण आहेत’, असे सांगतात.

ई. सासूबाई ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील प्रत्येक पानाकडे बघून नमस्कार करतात.

उ. श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार करून त्या सांगतात, ‘श्रीकृष्णामुळे मी पूर्ण बरी आहे. मला औषधाची एकही गोळी घ्यावी लागत नाही.’

ऊ. माझ्या दिरांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा सासूबाईंनी त्यांना नामस्मरण करण्याची आठवण करून दिली.

ए. दिरांचे अकस्मात् निधन झाल्याचे समजल्यावर त्या स्थिर राहून श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात शांतपणे म्हणाल्या, ‘‘आपल्यालाही एक दिवस असेच श्रीकृष्णाकडे जायचे आहे.’’

ऐ. प्रत्येक प्रसंगात ‘त्यांची देवावर श्रद्धा आहे’, असे लक्षात आले. या वेळी आम्हा सर्वांना त्यांच्या सहवासात आनंद मिळाला.

क्षमायाचना

माझ्याकडून सासूबाई आणि यजमान यांच्या संदर्भात अनेक चुका झाल्या. त्यासाठी त्या दोघांची आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची मी क्षमा मागते.

कृतज्ञता

माझ्यात पालट झाल्यामुळे घरातील वातावरणही पालटले आणि सद्गुरु (कु.) अनुराधाताईंनी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे सासूबाईंच्या सेवेचा सर्वांना आनंद घेता आला. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु (कु.) अनुराधाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

प्रार्थना

‘हे श्रीकृष्णा, यापुढे घरातील प्रत्येक व्यक्तीकडे मला साधक म्हणून पहाता येऊ दे. घरातील प्रत्येक कृती मला ‘सेवा’ म्हणून करता येऊ दे आणि घराला ‘गुरुमाऊलींचा आश्रम’ बनवता येऊ दे’, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. चारूलता भारत नखाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), कल्याण, ठाणे. (२४.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक