प्रौढ व्यक्तींचे धर्म वेगळे असले, तरी त्यांना वैवाहिक जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार ! –  अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – दोन प्रौढ व्यक्ती विवाह करत असतील, तर त्यांच्या  पालकांनाही त्यांच्या नात्यावर आक्षेप घेता येणार नाही. त्या दोघांचे धर्म वेगळे असतील तरी त्यांना वैवाहिक जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार आहे आणि हे वादग्रस्त असू शकत नाही. आमच्या विचारानुसार त्यांच्या नातेसंबंधावर कुणीही, अगदी त्यांचे पालकही आक्षेप घेऊ शकत नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना दिला. यात याचिकाकर्ता तरुण हिंदू असून तरुणी मुसलमान आहे. तरुणीच्या घरच्यांची विवाहाला अनुमती आहे. तरुणाची आईदेखील विवाह लावून देण्यास सिद्ध आहे; मात्र तरुणाचे वडील या विवाहला संमती देत नाहीत. त्यामुळे या दोघांनीही भविष्यात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत न्यायालयाकडून संरक्षण मागितले होते. त्यावर न्यायालयाने दोघांना कोणत्याही व्यक्तीकडून त्रास होणार नाही, याची निश्‍चिती करण्याचे आदेश पोलिसांना दिला आहे.