(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

  • असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्‍या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ? – संपादक
  • ६ दशके सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसने हिंदूंना नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली. असे का ? साडेसात लाख काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाकडे कानाडोळा करणारीही काँग्रेसच आहे. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामसेतूला तोडण्याचा प्रयत्नही काँग्रेसने केला. हिंदूंच्या आणि त्यांच्या मंदिरांच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादाला या देशात फोफावू देणारी काँग्रेसच आहे, हे लक्षात घ्या ! यावर राहुल गांधी काही बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे ! – संपादक

नवी देहली –  भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य आहे. ज्यांना संपूर्ण जग आदर्श मानते, त्या म. गांधी यांनी अहिंसेला उत्तम प्रकारे समजून घेतले आणि जगाला समजावून सांगितले. हिंदु धर्म हा अहिंसेचा पाया आहे, मग त्यांना गोळ्या का घातल्या गेल्या ? याचा विचार करायला हवा, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. (म. गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसप्रणीत दंगलींमध्ये सहस्रावधी ब्राह्मणांच्या हत्या झाल्या. वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच शिखांचे हत्याकांड घडले. म. गांधी यांना आदर्श मानणारे राहुल गांधी आणि काँग्रेस याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात ठेवा ! – संपादक) ते १५ सप्टेंबर या दिवशी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

गांधी पुढे म्हणाले,

१. देशात आज रा.स्व. संघ आणि भाजप यांचे सरकार आहे. त्यांची आणि आपली (काँग्रेसची) विचारसरणी भिन्न आहे. आपण इतर कुठल्याही विचारसरणीशी तडजोड करू शकतो; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या विचारसरणीशी कधीच तडजोड करणार नाही. (काँग्रेसने आतापर्यंत साम्यवादी, समाजवादी आदी हिंदूंचा पराकोटीचा द्वेष करणार्‍या राजकीय पक्षांशी युती केेली आहे. यातून काँग्रेसचा हिंदुद्वेष स्पष्ट होतो. यावर गांधी काय बोलणार आहेत ? – संपादक)

२. काँग्रेसची विचारसरणी ही गांधीजींच्या विचारांची आहे. भाजप- संघाची विचारसरणी ही गोडसे आणि सावरकर यांच्या विचारांची आहे. (हिंदूंना सावरकर यांची धर्म आणि राष्ट्र निष्ठा यांचा अभिमान वाटतो, हे राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक) दोघांमध्ये भेद आहे.

राहुल गांधी यांची हिंदु धर्माविषयी अज्ञान प्रकट करणारी हास्यास्पद वक्तव्ये !

१. माता लक्ष्मी म्हणजे काय ? लक्ष्मी ही घरात पैसा आणणारी शक्ती आहे, असा त्याचा अर्थ नाही. तर लक्ष्मी म्हणजे एक ध्येय ! एक राजकारणी, एक फुटबॉलपटू, ज्याचे काही तरी ध्येय आहे, ते पूर्ण करणारी शक्ती म्हणजेच लक्ष्मी !’

२. ‘जी शक्ती संरक्षण करते, तिला दुर्गा म्हणतात. दुर्गा आणि लक्ष्मी हे अधिकार आहेत. ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोणत्याही भेदभावाशिवाय पोचवण्याचे काम राजकारण्याचे असते. दुर्गा म्हणजे संरक्षण आणि लक्ष्मी म्हणजे ध्येय साध्य करण्याचे काम !