अटकेतील ६ पैकी दोघा आतंकवाद्यांना पाकमध्ये देण्यात आले घातपाती कारवाया करण्याचे प्रशिक्षण !

भारतात शांतता नांदायची असेल, तर पाकला नष्ट करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाक भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतला असतांना भारत सरकार त्याच्या विरोधात कठोर पावले का उचलत नाही ? – संपादक

६ जिहादी आतंकवादी

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने पकडलेल्या ६ जिहादी आतंकवाद्यांपैकी दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने घातपाती कारवाया करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवादी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांना हाताशी धरून आय.एस्.आय. उत्तरप्रदेश, देहली आणि महराष्ट्र राज्यांत नवरात्री आणि अन्य सणांच्या वेळी आक्रमण करणार होती. यासाठी प्रत्येक आतंकवादी गटाला वेगवेगळे काम सोपवण्यात आले होते.

१. मुंबईतील जान महंमद शेख, देहलीतील जामियानगरचा ओसामा उपाख्य सामी, उत्तरप्रदेशातील रायबरेलीचा मूलचंद उपाख्य लाला, बहराईच येथील महंमद अबू बकर,  प्रयागराज येथील झीशान कमर आणि आलमबाग येथील महंमद अमीर जावेद या आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

२. अटक केलेल्यांपैकी झीशान कमर आणि ओसामा या दोघांनी सांगितले की, ते प्रथम मस्कत येथे गेले. तेथून त्यांना समुद्र मार्गाने पाकिस्तानात नेण्यात आले. समुद्र प्रवासानंतर ते पाकमधील ग्वादर बंदराजवळील जिओनी येथे पोचले. येथून त्यांना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा भागात एका फार्महाऊसवर नेण्यात आले. येथे ३ पाकिस्तानी नागरिक होते. त्यातील जब्बार आणि हमजा यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. हे दोघेही पाकिस्तानी सैन्यातील होते. हमजा सामान्य नागरिकांसारखे कपडे परिधान करत होता; पण प्रशिक्षणाच्या वेळी सर्व त्याचा आदर करत होते.

३. झीशान कमर आणि ओसामा यांना बाँब आणि आय.ई.डी. (इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाईस) यांसारखे आधुनिक स्फोटके बनवण्याचे आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या साहाय्याने स्फोट करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच अनेक प्रकारच्या बंदुका आणि एके-४७ रायफल हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.

४. जान महंमद शेख याचे दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस याच्याशी संबंध आहेत. तो दाऊद टोळीसाठी काम करत होता. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून आता जान महंमद आणि त्याचे कुटुंबीय यांची चौकशी करण्यात येत आहे.