उपजतच ईश्वराची ओढ असणारे आणि निरपेक्षपणे लोकांना भक्ती करायला शिकवणारे पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज !

६ सप्टेंबर २०२१ या दिवशीच्या प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांच्या साधनाप्रवासाविषयी वाचले. आजच्या लेखात पू. बांद्रे महाराज यांच्या पुढील कार्याविषयी आणि पू. बांद्रे महाराज यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेला वार्तालाप पाहूया. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला.)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/508626.html

पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

९. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण केल्यावर ‘वाचकांना दैनिक वाचण्यात अडचण नाही ना ?’, याचाही आढावा घेणे

श्री. शिवराम बांद्रे

श्री. शिवराम बांद्रे : सनातन संस्थेकडे त्यांचा (पू. बांद्रे महाराज यांचा) पुष्कळ ओढा आहे. आपल्या समितीच्या हिंदुराष्ट्र जागृती सभेला, अधिवेशनाला येऊन ते अगदी सर्वसामान्य साधकाप्रमाणे, ‘एखादा तरुण करू शकणार नाही’, अशा अतिशय कष्टाच्या सेवा करतात. ते करत असलेल्या सेवा पाहून आम्हाला ‘त्यांच्या माध्यमातून विठ्ठलच कार्य करतो’, हे लक्षात येते.

त्यांचे एक चांगले वैशिष्ट्य आहे की, ते मंदिराचे कार्य आणि प्रवचने यांतून सनातन संस्थेचाही प्रसार करतात. संत झाल्यानंतर सनातन संस्थेच्या त्यांनी देवतांच्या चित्रांच्या (फ्रेम) मोठ्या आकाराच्या ३५ चौकटी वितरित केल्या. त्याच समवेत त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे २३ वर्गणीदारही केले आहेत. रविवारी ते घरोघरी जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात. ते नुसतेच वितरण न करता वाचकांचा आढावाही घेतात. ‘‘दैनिक वाचले का ? वाचण्यात काही अडचण नाही ना ?’’, असे ते स्वतःहून विचारतात.

१०. कुणाकडून पैशाची अपेक्षा न करता निःस्वार्थीपणे प्रवचने आणि धर्माचे कार्य करणे

इतर संप्रदायांमध्ये बघितले, तर सगळ्यांनाच ठाऊक आहे की, प्रवचन किंवा कीर्तन केले, तर प्रवचनकार किंवा कीर्तनकार त्यासाठी पैसे घेतात किंवा त्यांच्या अन्य बर्‍याच अपेक्षाही असतात. ‘महाराजांचा निःस्वार्थपणा म्हणजे त्यांच्या (मंदिराच्या) पेटीत किती टाकावे किंवा कुणी काय टाकावे’, याची त्यांना अपेक्षा नाही. त्यांनी एवढी प्रवचने केली; परंतु त्यांनी एका पैशाचीही अपेक्षा केली नाही.

पू. महाराजांकडून आम्ही नेहमी ऐकतो, ‘‘हे सगळे कार्य देव चालवतो. मी कधी विचारच करत नाही. ‘माझ्याकडे किती पैसे शिल्लक आहेत ? किंवा काही धान्य आहे का ?’, याचा मी कधी विचार करत नाही; पण मला कधी काहीच न्यून पडत नाही.’’ त्यामुळे त्यांचा ‘निःस्वार्थीपणा’ लोकांच्या लक्षात येऊ लागला. समाजाच्या लक्षात आले की, ‘हे केवळ समाज, देश आणि धर्म यांसाठीच करत आहेत. स्वतःसाठी काहीच करत नाहीत.’

११. पू. बांद्रे महाराज यांच्यामुळे समाजही चांगला घडत असणे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे ते कार्य करत असणे

कु. प्रियांका लोटलीकर : त्यांच्यातील चैतन्यामुळेच ते कार्य करू शकतात.

श्री. शिवराम बांद्रे : हो, म्हणजे ते वयस्कर असूनही, तरी ते सेवा करतांना पुष्कळ उत्साहाने करतात. त्यामुळे आता गावातील लोकांना ‘त्यांचे कार्य पुष्कळ चांगले आहे’, हे ठाऊक झाले आहे. त्यांच्यामुळे समाजही चांगला घडत आहे. मलाही त्यांनीच घडवले आहे.

१२. पू. महाराज यांच्यासारखे संतरत्न कुटुंबात दिल्यामुळे श्री. शिवराम बांद्रे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे

श्री. शिवराम बांद्रे : पू. महाराजांना संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन झाले. त्या वेळी त्यांचे वय ४०-४५ वर्षे असेल. त्यानंतर पू. महाराजांना स्फूर्ती झाली. तेव्हा भगवंतानेच त्यांच्या मनात विचार घातला, ‘आता आपले उर्वरित आयुष्य देवाच्या चरणी अर्पण करावे.’ त्यांनी आम्हाला साधनेत पुष्कळ साहाय्य केले. ते स्वतः पुढे गेले आणि आम्हालाही पुढे नेले. आमच्या गावामध्ये कुणी संत नव्हते. प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) पुष्कळ मोठी कृपा आहे. गुरुदेवांनी आम्हाला, आमच्या कुटुंबात हे संतरत्न दिले.

पू. महाराजांच्या रूपात गावाला निःस्वार्थी संत मिळाले. ‘आम्ही कितीही साधना केली, तरी आम्ही त्यांचे हे ऋण फेडू शकणार नाही’, असे वाटते.

१३. एका विवाहाच्या वेळी वधू पोशाख पालटण्यासाठी गेली असता तिला होणारा आध्यात्मिक त्रास वाढणे, पू. महाराजांनी तिच्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर लग्न व्यवस्थित पार पडणे

कु. प्रियांका लोटलीकर

कु. प्रियांका लोटलीकर : पू. महाराज, एखादे उदाहरण सांगा की, तुम्ही लोकांसाठी कशा प्रकारे नामजपादी उपाय केले आहेत ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : एका विवाहसोहळ्यामध्ये निरोपसमारंभाच्या वेळी लोक भेटवस्तू देण्यासाठी वधूवरांची वाट पहात होते. वधू पोशाख पालटण्यासाठी गेली असता तिला होणारा आध्यात्मिक त्रास वाढला. लाकडाला आपटून ती खाली पडली आणि तिने डोळे फिरवले. तिचे डोके मांडीवर घेऊन सगळे रडत होते. तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला, ‘‘तुम्ही चांगली साधना करता, तर हा गोंधळ थांबवा ना !’’ मी भगवंताचे नाव घेतले आणि वधूच्या डोक्यावर हात ठेवून म्हणालो, ‘देवा, माझे काही पुण्य असेल, तर आज मला तुझा साक्षात्कार बघायचा आहे. ‘तू देव आहेस’, हेही मला बघायचे आहे.’ वधूने लगेच डोळे उघडले. त्यानंतर सगळे व्यवस्थित पार पडले आणि संध्याकाळी ती वरातीच्या समवेत सासरी गेली.

आजपर्यंत मी दोन-अडीच सहस्र लोकांसाठी असे नामजपादी उपाय केले आहेत. लोक बरे झाले की, सगळे विसरतात. ते पुन्हा माझे तोंड बघायला येत नाहीत आणि देवाचेही दर्शन घ्यायला येत नाहीत. हा समाज ‘कामापुरता मामा’, असा आहे. मी खोटे बोलत नाही; कारण ‘खोटे बोलल्याने साधना खर्च होते’, हे मला सनातन संस्थेत आल्यावर समजले.

१४. इथून पुढे ७५ टक्के प्रवचने सनातन संस्थेच्या कार्याविषयीच होणार असल्याचे पू. महाराजांनी सांगणे

कु. प्रियांका लोटलीकर : आश्रमात आल्यावर सनातन संस्थेविषयी तुमचे मत काय झाले आहे ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : मी सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमामध्ये टापटीपपणा पाहिला, येथील स्वयंपाकघर, सेवेची ठिकाणे आणि त्यांचे कार्य पाहिले. आता मी चिपळूणला परत गेल्यावर संस्थेच्या कार्याविषयीच प्रवचने करणार आहे. आता माझी ७५ टक्के प्रवचने सनातन संस्थेविषयीच असतील.

१५. लग्न किंवा इतर कार्यक्रमांमध्ये कुणाला भेटवस्तू द्यायची असल्यास सनातन संस्थेचे ग्रंथ भेट द्यावे !

कु. प्रियांका लोटलीकर : घरात कोणते धर्मग्रंथ असावेत ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : तुकारामगाथा, तुलसीदासांचे रामायण, ज्ञानेश्वरी, समर्थ रामदासस्वामींचे दासबोध, हरिपाठ आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ आपल्याकडे असले पाहिजेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथही सुशिक्षित समाजासाठी उपयुक्त आहेत, तेही घरात असायला हवेत. कुटुंबात होणार्‍या लग्नासाठी लोक लाखो रुपये व्यय करतात. लग्नामध्येही कुणाला भेटवस्तू द्यायची असेल, तर पैसे देऊ नका. तुमच्या १००-२०० रुपयांनी त्यांचे काय होणार आहे ? सनातन संस्थेने संकलित केलेल्या ग्रंथांत शास्त्र सांगितलेले आहे. पैसे देण्यापेक्षा असे ग्रंथ भेट द्या. ज्ञान सगळ्यांत महत्त्वाचे आहे. कुणालाही जेवण दिले, त्याचा परिणाम दुसर्‍या दिवसापर्यंत टिकतो; पण सनातनचे ज्ञान दिले, तर तुम्ही सुखी व्हाल. इतरांना ग्रंथ दिल्याने तुम्हाला पुण्य मिळेलच आणि ज्याला द्याल, त्याचाही उद्धार होईल. लोकांनी ही प्रथा चालू करावी.

१६. सर्वांनी आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी सनातन संस्थेने सांगितलेली साधना करावी !

कु. प्रियांका लोटलीकर : हे ज्ञान आपल्याला आयुष्यभर पुरते.

पू. सखाराम बांद्रे महाराज : आता सगळे अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम आई-वडिलांनी भरलेले आहेत. आजची पिढी मोहाच्या आहारी गेली आहे. मुलांना आई-वडिलांची संपत्ती पाहिजे; पण आई-वडील नको. मुलांना त्यांची अडचण होते. जग भयंकर वाईट स्थितीमध्ये आहे; म्हणून नारायण (परात्पर गुरु डॉक्टर) आलेला आहे. त्यांचा एक एक शब्द मी ऐकला. त्यांच्या जीवनाचे सोने झाले आहे. आपणही सर्वांनी त्यांच्यासारखे जीवनाचे सोने करून घ्यावे. सर्वांनी सुखी आणि आनंदी होऊया. सुख, समाधान आणि आनंद मिळवण्यासाठी सगळ्यांनी सनातन संस्थेने दिलेला बोध (दृष्टीकोन), साधना आणि सनातन संस्थेने सांगितलेला नामजप करत रहा अन् अनुभूतीही घ्या.

१७. ‘सर्व संप्रदायांनी धर्मासाठी एकत्र यावे’, असे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे

कु. प्रियांका लोटलीकर : लोकांना तुम्ही काय संदेश द्याल ?

पू. सखाराम बांद्रे महाराज : सनातन संस्थेच्या साधकांनी सगळ्या संप्रदायांमध्ये जाऊन त्यांना हात जोडून सांगितले, ‘आपण हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यासाठी एकत्र येऊया.’ आज किती वर्षे झाली; पण या संप्रदायांनी सहकार्य केले नाही. ते आपल्या वेगवेगळ्या चुली मांडत आहेत. उद्या अतिरेकी किंवा शत्रूराष्ट्रातील कुणी आले, तर ‘हा अमुक संप्रदायातील आहे, याला मारायचे नाही’, असे ते म्हणतील का ? आपण संघटित असलो, तर आतंकवादी आपल्या घरामध्ये घुसेल का ? म्हणून ‘सर्व संप्रदायांनी एकत्र यावे’, असा माझा आजचा संदेश आहे.

१८. नारायणाच्या सगुण रूपाचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन घ्यायची ओढ लागल्याचे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे

पू. सखाराम बांद्रे महाराज : मला आधीपासून नारायण आवडायचा. इथेही सगुण रूपात नारायणच (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहे; पण मला अजून त्याचे दर्शन झाले नाही. त्यांच्या दर्शनासाठी मी माशासारखा तडफडत आहे. मला नारायणचे सगुण रूप पहायचे आहे. एवढे कार्य कुणी सामान्य मनुष्य करत नाही. ते ‘नारायण’च आहेत. ‘भक्त प्रल्हादासारखे त्यांना कधी एकदा पाहीन ?’, असे मला झाले आहे. त्यांच्या भेटीची ओढ मला लागली आहे.

(समाप्त)