सोनांकुर पशूवधगृहाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा अनधिकृत जोडरस्ता त्वरित बंद करावा !

मानद पशूकल्याण अधिकारी विलास शहा यांची निवेदनाद्वारे मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – भाग्यनगर रस्त्यावरील मुळेगाव येथील सोनांकुर पशूवधगृह ते राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा जोडरस्ता संबंधितांची अनुमती नसतांनाही अनधिकृतपणे वापरण्यात येत आहे. त्यामुळे सदरचा जोडरस्ता त्वरित बंद करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन नियुक्त मानद पशूकल्याण अधिकारी विलास शहा आणि ‘आधार सोशल फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रसाद माने यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे निवेदनाद्वारे दिली आहे. (ही मागणी अधिकार्‍यांना का करावी लागते ?, हा जोडरस्ता अनधिकृतपणे वापरण्यात येत आहे, ते पोलिसांच्या लक्षात येत नाही का ? – संपादक)

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या…

१. मुळेगाव येथील सोनांकुर एक्सपोर्ट प्रा.लिमिटेडचे चालक शाकीर कुरेशी हे सोनांकुर पशूवधगृह ते राष्ट्रीय महामार्ग हा जोडरस्ता संबंधितांची अनुमती न घेता अनधिकृतपणे वापरत आहेत, तसेच त्यांनी पशूवधगृहाच्या बांधकामाविषयीच्या कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

२. पशूवधगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून सदर इमारतीत पशूवधगृह चालू केल्याची माहिती त्यांनी जाणूनबुजून नाहरकत प्रमाणपत्र देणार्‍या अधिकार्‍यांपासून लपवली आहे.

३. पशूवधगृह ते राष्ट्रीय महामार्ग हा जोडरस्ता त्वरित बंद करण्यात यावा.

४. पशूवधगृहास दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रहित करण्याच्या मागणीसाठी आज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.