आक्रमण करणार्‍या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण

मुंबई – ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी ३ सप्टेंबर या दिवशी भ्रमणभाषद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘तुमचे कोणत्या शब्दांत कौतुक करावे ! मी तुम्हाला शब्द देतो की, तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार, असे म्हणत आहात; पण आता ते दायित्व आमच्या सर्वांचे आहे. तुम्ही चिंता करू नका. लवकर बरे व्हा.’’ यानंतर पिंपळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली, ‘‘या प्रकरणातील गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे.’’ यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘‘अगदी अगदी. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर ठीक व्हा. दोषींना नक्की शिक्षा होणार आणि कठोर शिक्षा होणार.’’     कल्पिता पिंपळे सध्या त्या ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. अवैध फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करतांना त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या आक्रमणात त्या घायाळ झाल्या आहेत.