पुत्तुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्‍वर मंदिराच्या भूमीवर केवळ हिंदूंना वाहने उभी करण्यास अनुमती !

  • हिंदूंनाच वाहने उभी करण्यास अनुमती !

  • पुरो(अधो)गाम्यांकडून नियमाला विरोध !

चर्च आणि मशीद यांच्या भूमीवर अन्य धर्मियांना म्हणजेच हिंदूंना वाहने लावण्याची अनुमती दिली जाते का ? हे पुरो(अधो)गामी सांगतील का ? – संपादक
पुत्तुरू येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्‍वर मंदिर

मंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील पुत्तुरू येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या वाहनतळात हिंदूंच्या व्यतिरिक्त अन्य धर्मियांनी वाहने उभी करू नयेत, असा आदेश देवस्थानच्या कार्यकारी समितीने काढला आहे. एवढेच नव्हे, तर अन्य धर्मियांनी वाहन उभी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश काढून त्याविषयी मंदिराच्या मंडपामध्ये फलक लावण्यात आला आहे. या मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. अन्य धर्मीय वाहनतळात त्यांची वाहने उभी करून जात असल्याने मंदिरात येणार्‍या भक्तांना अडचण होत होती. याविषयी अनेक तक्रारी आल्यानंतर देवस्थान समितीने हा आदेश काढला.

‘मंदिराच्या भूमीवर हिंदूंना वाहने उभी करण्यास प्राधान्य द्यावे आणि अन्य धर्मियांना रोखावे’, अशी मागणी विश्व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांनी कार्यकारी समितीला निवेदन देऊन केली होती. त्यावरून समितीने मंदिराचा मालकी हक्क असलेल्या वाहनतळाच्या संदर्भात हा नियम केला आहे. (हे कार्यकारी समितीच्या लक्षात का आले नाही ? राज्यातील अन्य मंदिरांमध्येही असेच होत असेल, तर त्यांनी आताच अशा प्रकारचा निर्णय घेणे आवश्यक आहे. वाहनांच्या माध्यमांतून जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमणे केल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने मंदिर समित्यांकडून सतर्कता बागळणे आवश्यक आहे. राज्यातील भाजप सरकारनेही याविषयी मंदिरांना नियम करण्यास सांगितले पाहिजे ! – संपादक) या निर्णयाचे हिंदुत्वनिष्ठांनी स्वागत केले आहे, तर पुरो(अधो)गाम्यांनी टीका केली आहे.

१. याविषयी स्पष्टीकरण देतांना मंदिराच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुळीय केशवप्रसाद म्हणाले की, हिंदु धर्मादाय कायद्याखाली महालिंगेश्वर देवस्थान येत असल्याने हिंदूंना प्राधान्य देण्यात आले आहे.

२. यापूर्वी विहिंप आणि बजरंग दल यांनी जत्रेच्या वेळी अन्य धर्मियांना दुकाने लावण्यास बंदी घालण्याचा आग्रह केला होता. त्यानुसार जत्रेच्या वेळी अन्य धर्मियांना दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली होती. (प्रत्येक वेळी हिंदूंच्या संघटनांनी सांगितल्यावरच मंदिर समिती जागी होणार आहे का ? यासाठी हिंदूंची मंदिरे सरकारच्या नाही, तर भक्तांच्या नियंत्रणात असली पाहिजेत ! – संपादक)