मुंबई – महावितरणच्या घरगुती वापर होणार्या ग्राहकांना ‘रूफटॉप’ म्हणजे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्रशासनाकडून ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये ‘नेटमिटरींग’द्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज विकत घेतली जाणार आहे. केंद्रशासनाच्या या योजनेमुळे वीजदेयकाच्या रकमेत मोठी कपात होणार आहे.
१. केंद्रशासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या या योजनेच्या दुसर्या टप्प्याच्या अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॅट इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे.
२. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के, ३ किलोवॅटहून अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट, तर गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटना यांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.
३. महावितरणने या योजनेसाठी यंत्रणा बसवण्यासाठी परिमंडळनिहाय एजन्सी नियुक्त केली आहे. तिची सूची आणि ‘ऑनलाईन’ अर्जाची सुविधा महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
४. पाच वर्षांच्या देखभाल व्ययासह रूफटॉप सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट ४६ सहस्र ८२०, १ – २ किलोवॅट ४२ सहस्र ४७०, २ – ३ किलोवॅट ४१ सहस्र ३८०, ३ ते १० किलोवॅट ४० सहस्र २९०, तसेच १० ते १०० किलोवॅटसाठी ३७ सहस्र २० रुपये प्रति किलोवॅट मूल्य घोषित करण्यात आले आहे.
५. या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी १ लाख २४ सहस्र १४० रुपये व्यय येईल. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ सहस्र ६५६ रुपये इतके केंद्रीय वित्त साहाय्य मिळेल. संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात ७४ सहस्र ४८४ रुपयांचा व्यय करावा लागेल.
६. रूफटॉप सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील १ किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून सध्याच्या वीजदरानुसार दरमहा ५५० रुपयांची बचत होऊ शकेल.
७. या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक लाभ संबंधित घरगुती ग्राहकांना होणार आहे.
८. सौर यंत्रणा उभारणीच्या व्ययाची साधारणत: ३ ते ५ वर्षांत परतफेड होणार आहे. प्रतिमहा वीजदेयकातील आर्थिक बचत, तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन न्यून करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गातील वीजग्राहकांनी रूफटॉफ सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.