(म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही !’ – तालिबान

शीख आणि हिंदू यांना संरक्षण देणार !

तालिबानची मानसिकता, त्याचा इतिहास आणि पाकची असलेली फूस यांमुळे त्याच्या या बोलण्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? स्वतःच्या पित्याला आणि भावाला ठार करणार्‍या मोगली मानसिकतेच्या जिहाद्यांवर विश्‍वास ठेवण्याचा मूर्खपणा भारत कधीही करणार नाही ! – संपादक

तालिबानी नेता अनास हक्कानी

काबुल (अफगाणिस्तान) – काश्मीरच्या प्रश्‍नामध्ये तालिबान अजिबात हस्तक्षेप करणार नाही. काश्मीर प्रश्‍नामध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याची कधीही इच्छा नव्हती. तसे आमचे धोरणही नाही. त्यामुळे त्याविरोधात जाऊन तालिबानी कोणतेही कृत्य करणे शक्य नाही. आम्हाला भारताशी उत्तम संबंध निर्माण करायचे आहेत. अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांना तालिबानी कोणतीही दुखापत करणार नाहीत. त्यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल, असे तालिबानी नेता अनास हक्कानी याने म्हटले आहे. अनास याचा नातेवाईक सिराजुद्दीन हा ‘हक्कानी नेटवर्क’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आहे.

अनास हक्कानी पुढे म्हणाला की, आम्ही कुणाशीही चर्चा करण्यास सिद्ध आहोत.  अफगाणिस्तानची परकियांपासून मुक्तता करण्यासाठी आम्ही २० वर्षे संघर्ष केला; मात्र जगभरातील विशेषत: भारतातील प्रसारमाध्यमे तालिबानविषयी अतिशय नकारात्मक पद्धतीने लिखाण करत आहेत.

(म्हणे) ‘पाकच्या शस्त्रांचा वापर नाही !’

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी दिलेल्या लढ्यात पाकिस्तानमध्ये बनवलेल्या एकाही शस्त्राचा वापर करण्यात आला नाही, असा दावाही हक्कानी याने केले. (यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)