मराठवाड्यातील काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – येथे ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या पावसाने मराठवाड्यात थैमान घातले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील हदगाव आणि कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर लातूर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव येथे जोरदार पाऊस झाला. संभाजीनगरच्या कन्नड घाटात दरड कोसळली. ही दरड गोवंशियांना घेऊन जाणार्‍या ट्रकवर कोसळल्याने या घटनेत ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून काही गोवंशियांनाही जीव गमवावा लागला आहे.

१. गोदावरी नदीवरील हिरडपुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. बंधार्‍यातील पाणी कधीही सोडले जाण्याची शक्यता आहे. बंधार्‍याखालील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. पाचोड परिसरातील नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे काही गावात पुराचे पाणी शिरले आहे. पाचोड खुर्दसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांची मोठी हानी झाली आहे.

२. परभणीच्या पाथरी तालुक्यात हदगाव आणि कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामध्ये हदगाव आणि कासापुरी मंडळात झालेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सर्वाधिक परिणाम हदगाव मंडळात झाला असून नदीला आलेल्या पुरामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी साचले. काही नागरिकांच्या घरात ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने साहित्याची मोठी हानी झाली आहे.

३. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने पिकांची मोठी हानी झाली आहे. पाऊस आणि वारा यांमुळे अनेक गावांतील शेतकर्‍यांचा ऊस आडवा झाला आहे.


नगर जिल्ह्यात अतीवृष्टी, अनेक गावांत पूरस्थिती !

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – सध्या मराठवाडा आणि विदर्भ यांसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस चालू असून नगर शहर तसेच जिल्ह्यातही संततधार चालू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतीवृष्टी झाली असून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरीचा काही भाग, नगर तालुका या भागांत अधिक पाऊस झाला आहे. नगर शहरातून वहाणार्‍या सीना नदीला तसेच शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे जनावरे आणि पिके पाण्यात गेली असून नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत, तसेच घरांचीही हानी झाली आहे.