(म्हणे) ‘तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारखे आक्रमण होऊ शकते !’

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ यांची चेतावणी !

  • तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे ! – संपादक
  • अशा प्रकारचे विधान करून पाकिस्तान तालिबानची वकिली करत आहे. त्यामुळे पाकला ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ या न्यायाने नष्ट करणेच आवश्यक ! – संपादक
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारख्या (९ सप्टेंबर २००१ या दिवशी अल् कायदाच्या आतंकवाद्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या दोन इमारतींवर विमानांद्वारे आक्रमण केले होते.) आक्रमणाचा सामना करावा लागू शकतो, अशी चेतावणी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ यांनी पाश्‍चात्त्य देशांना दिली आहे.

डॉ. मोईद युसूफ म्हणाले की,

१. अफगाणिस्तानला दुसर्‍यांदा जगापासून वेगळे सोडले, तर पाश्‍चात्त्य देशांसमोर निर्वासितांचा व्यापक प्रश्‍न निर्माण होईल. वर्ष १९८९ मध्ये जेव्हा सोव्हिएत युनियनचे सैन्य या भागातून माघारी गेले होते, तेव्हा पाश्‍चात्त्य देशांनी अफगाणिस्तानपासून अंतर ठेवले होते. तसेच अफगाणिस्तानला आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनू दिले. पाकिस्तानने आतापर्यंत तालिबानला मान्यता दिलेली नाही; मात्र जागतिक समुदायाला विनंती आहे की, त्यांनी तालिबानसोबत चर्चा करावी, ज्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने पोकळी निर्माण होणार नाही. आता जगासमोर ती वेळ आली आहे जेव्हा तालिबानचे ऐकले पाहिजे, तसेच आधीच्या चुकांपासून वाचले पाहिजे.

२. अफगाणिस्तानमध्ये जर पैसे नसतील, तिथे प्रशासन नसेल आणि इस्लामिक स्टेट अन् अल् कायदा यांसारखे गट तेथे त्यांची पाळेमुळे रोवत असतील, तर काय होऊ शकते, याचा विचार झाला पाहिजे. तसेच तेथे निर्माण होणारे निर्वासितांचे संकट केवळ या भागापुरते मर्यादित रहाणार नाही.

३. या संकटामुळे निर्वासितांचा लोंढा वाढेल, आतंकवाद वाढेल. असे व्हावे, असे कुणालाही वाटणार नाही. अफगाणिस्तानला एकटे सोडल्यामुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. तिथे जे आंतरराष्ट्रीय आतंकवादी आहेत, ते आतंकवादाचा मार्ग अवलंबू शकतात. तिथे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते आणि त्याची परिणती म्हणून अखेरीस ९/११ सारख्या आक्रमणामध्ये होऊ शकते.