ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी भारतीय वाद्यांच्या आवाजात ‘हॉर्न’ वाजणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

कायदा करण्याचा विचार चालू

नागपूर – वाहनांच्या कर्णकर्कश ‘हॉर्न’मुळे पुष्कळ प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. परिवहन विभागामध्ये ‘हॉर्न’च्या आवाजाच्या संदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे ‘हॉर्न’चे आवाज मंजूळ करून त्यात भारतीय वाद्यांचा उपयोग करून आवाज अल्प कसा राखता येईल, या संदर्भात कायदा करण्याचा विचार चालू आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’च्या ‘ध्वनीप्रदूषण जागरूकता अभियाना’चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की,

भविष्यात सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमती अल्प होतील.

पेट्रोल अन् डिझेल यांचा वापर अल्प झाल्यामुळे प्रदूषण अल्प होईल. ‘ग्रीन हायड्रोजन’च्या संदर्भात धोरण सिद्ध केले जात असून त्या माध्यमातून जलप्रदूषण अल्प करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.