भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍या टोळीतील २ धर्मांधांना अटक !

  • टोळीकडून ५ राज्यांमध्ये १०३ मशिदींचे बांधकाम !

  • धर्मांतर आणि मशिदींचे बांधकाम यांसाठी विदेशातून अर्थसाहाय्य !

  • भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसे पाठवले जात असतांना गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत ? ही धोक्याची घंटा ओळखून भारत सरकार याच्या विरोधात पावले उचलणार का ? – संपादक 
  • धर्मांतर विरोधी कायदा करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होते ! – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारतात हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी टोळी कार्यरत आहे. त्यातील सलाहुद्दीन शेख आणि उमर गौतम या २ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना धर्मांतरासाठी हवाला (अवैध पद्धतीने केली जाणारी पैशांची देवाण-घेवाण. यात प्रामुख्याने विदेशातील पैसा संंबंधित देशातील व्यक्तला पाठवला जातो.) माध्यमातून ६० कोटी रुपये मिळाले होते, तसेच त्यांनी ५ राज्यांमध्ये १०३ मशिदींचेही बांधकाम केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.

१. ही टोळी गुजरातमध्येही कार्यरत होती. याविषयी राज्यातील बडोद्याचे पोलीस आयुक्त समशेर सिंह यांनी सांगितले की, मागील ५ वर्षांमध्ये या आरोपींना विदेशातून देणग्यांच्या स्वरूपात १९ कोटी रुपयेही प्राप्त झाले आहेत. या टोळीला दुबईतून हवाल्याच्या माध्यमातून हा पैसा भारतात पाठवला जात होता. या आरोपींना एका न्यासाच्या माध्यमातून इंग्लंड, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात या देशांमधून देणग्याही मिळाल्या आहेत. सरकारच्या विरोधात कारवाया करण्यासाठीही हवालाच्या पैशांचा वापर झाला आहे.

२. लोकांना फसवून त्यांचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केल्याच्या प्रकरणात उत्तरप्रदेशातील आतंकवादविरोधी पथकाने उमर गौतम याला अटक केली होती. त्यानंतर त्याला धर्मांतरासाठी पैसा पुरवल्याच्या प्रकरणी सल्लाहुद्दीन शेख याला बडोदा येथून अटक केली होती. हे दोन्ही आरोपी सध्या लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील कारागृहात बंद आहेत.

३. समाजसेवेच्या माध्यमातून सलाहुद्दीनची ‘अमेरिका फेडरेशन ऑफ मुस्लिम ऑफ इंडियन ओरिजीन’ (ए.एफ.एम्.आय.) ही संस्था विदेशातून वर्गणी गोळा करण्याचे काम करते, अशी माहिती उत्तरप्रदेश आणि गुजरात येथील आतंकवादविरोधी पथकांना नुकतीच मिळाली होती. त्यानंतर या संस्थेच्या विरोधात कारवाई करण्यात आली.