अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गुरुदेवांप्रतीच्या दृढ श्रद्धेने भावपूर्ण सेवा करणार्‍या चिंचवड (पुणे) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुरेखा अरुण वाघ (वय ५४ वर्षे) !

‘६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता ‘त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?’, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. प्रतिकूल परिस्थितीत गुरुदेवांना शरण जाऊन त्यांना प्रार्थना केल्याने सेवा करता येणे

सौ. सुरेखा वाघ

‘ज्या दिवशी दळणवळण बंदी चालू झाली, त्याच दिवशी वाघकाकूंचा भ्रमणभाष काही कारणाने बिघडल्यामुळे त्यांना सेवा करणे आणि सत्संग मिळणे अशक्य होऊ लागले. त्यांनी या स्थितीत गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून त्यांना प्रार्थना केली. काकूंचा मुलगा त्याचा भ्रमणभाष काकूंना वापरायला देऊ लागला. त्यामुळे त्यांना सत्संग मिळू लागला. भगवंताला शरण जाऊन मुलाच्या भ्रमणभाषच्या साहाय्याने त्यांनी सेवाही भावपूर्ण केल्या.

२. शरणागतभावाने साधनेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न

काकूंच्या संपर्कातील एक उद्योजक दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘पीडीएफ्’ आणि भावसत्संगाची ‘लिंक’ ५०० जणांच्या गटामध्ये, एका मंदिराचे विश्वस्त २०० जणांच्या गटामध्ये आणि एक वाचक २०० जणांच्या गटामध्ये पाठवतात. या पद्धतीने ९०० जणांपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘पीडीएफ्’ आणि भावसत्संगाची ‘लिंक’ पोचते. त्यातील १०० व्यक्ती दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘पीडीएफ्’ वाचतात. काकूंनी हे त्यांचा भ्रमणभाष चालू नसतांनाही गुरुदेवांना प्रार्थना करून आणि ‘गुरुदेव सर्व करवून घेत आहेत’, या श्रद्धेने केले. काकूंनी गुरुपौर्णिमेच्या काळात त्यांच्या गटातील ३ वाचकांना साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेण्याचे ध्येय घेतले होते. ते तीनही वाचक प्रतिदिन ‘सनातन प्रभात’ची ‘पीडीएफ्’ इतरांना पाठवतात. ते वाचक ३ घंटे नामस्मरण करतात. ते स्वभावदोष निर्मूलनासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करतात. काकूंनी हे सर्व भ्रमणभाषच्या साहाय्याने त्यांच्या संपर्कात राहून आणि नामजपादी आध्यात्मिक उपाय अन् प्रार्थना करून केले.

३. नामजपाप्रती दृढ श्रद्धा

एकदा अकस्मात् काकूंचे पोट बिघडले. त्या एक आठवडा लिंबू-पाणी घेत होत्या. त्यांना जेवण जात नव्हते. ‘केवळ प्रार्थना आणि नामजप यांमुळे मी जिवंत आहे’, असे त्या म्हणतात. कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ वाढवणारा श्री दुर्गा-दत्त-शिव यांचा नामजप करत असतांना ‘देवीची शस्त्रे नामजपादी उपाय करत आहेत’, असा भाव ठेवल्याने त्या या आजारातून बाहेर पडल्या.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणे

त्यांचे यजमान मार्च २०२० मध्ये गावाला गेले. ‘तेथे शेती करतो’, असे ते म्हणाले. ते परत आले नाहीत. ते घरी असतांनाही खर्चासाठी पैसे देत नव्हते. त्यांचा मुलगा रिक्शा चालवण्याचा व्यवसाय करतो; मात्र ‘दळणवळण बंदीमुळे मुलाची रिक्शा बंद होती. त्यांनी ‘प्रतिकूल स्थितीत देव मला साहाय्य करत आहे’, असा भाव ठेवला. नंतर मुलगा आणि नातेवाईक यांनी त्यांना आर्थिक साहाय्य केले.

दळणवळण बंदीच्या काळात मुलाला नोकरी नव्हती. अशा स्थितीत त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे घडू दे.’ त्यांचा मुलगाही गुरुदेवांना प्रार्थना करत होता. मुलाला ‘टेल्को’ आस्थापनात नोकरी मिळाली. एका आठवड्यात तो ‘सुपरवायझर’ (पर्यवेक्षक) म्हणून नोकरी करू लागला. काकू म्हणतात, ‘‘गुरुदेवांनी एवढे साहाय्य केले की, त्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.’’

५. सतत कृतज्ञताभावात असणे

काकू सांगतात, ‘‘देवच माझ्याकडून कोणत्याही परिस्थितीत भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करवून घेत आहे. आता मनाला शांतता आणि स्थिरता जाणवत आहे. गुरुदेवच सेवा देतात आणि तेच करवून घेतात. आपण सकारात्मक विचार आणि नामजपादी आध्यात्मिक उपाय करायचे. एवढेच करू शकतो.’’

– सौ. वंदना संकपाळ, चिंचवड, पुणे (२७.८.२०२०)

गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भोळा भाव यांमुळे अडचणींना सामोरे जाऊन झोकून देऊन सेवा करणे

कु. वैभवी भोवर

‘सौ. वाघकाकूंना गुरुसेवेची पुष्कळ तळमळ आहे. दळणवळण बंदीच्या आधी विविध उपक्रम व्हायचे. तेव्हा काकू सेवेत त्यांच्या क्षमतेपलीकडे स्वतःला झोकून द्यायच्या. घरात विविध अडचणी असूनही गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भोळा भाव यांमुळे काकू अडचणींना सामोर्‍या जातात. त्या अडचणींचा कुठेही सेवा किंवा साधना यांवर परिणाम होऊ देत नाहीत.’ – कु. वैभवी सुनील भोवर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे