अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाण्याची अनुमती देणार नाही ! – तालिबान

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यापासून लक्षावधी अफगाण नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे. यामुळे काबुल विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. आतापर्यंत सहस्रो अफगाण नागरिकांनी देश सोडला असून ते इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून पोचले आहेत. त्यामुळे तालिबानने अफगाण नागरिकांना देश सोडून न जाण्याची चेतावणी दिली आहे. ‘आता कोणत्याही अफगाण नागरिकाला देश सोडून जाण्याची अनुमती देणार नाही’, असे तालिबानने म्हटले आहे.

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने सांगितले की, काबुल विमानतळाच्या दिशेने जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. अफगाणी नागरिक त्या मार्गाने विमानतळावर जाऊ शकत नाहीत; मात्र परदेशी नागरिकांना विमानतळावर जाण्याची अनुमती असणार आहे.