…तर कदाचित् कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. हे संकट आपल्याला टाळायचे आहे. आपण जर नियम पाळले नाहीत, तर कदाचित् कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईतील कोविड काळजी केंद्राचे २० ऑगस्ट या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर रुग्णालयात त्यांना भयावह वातावरण न वाटता चांगले वातावरण असावे, यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे. दळणवळण बंदी टाळायची असेल, तर कुणी कितीही चिथावले, तरी त्याला प्रतिसाद देऊ नका. राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन लागेल, तेव्हा कदाचित् आपल्याला राज्यात दळणवळण बंदी करावी लागेल. अर्थचक्र चालू रहावे, यासाठी काही निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मी सर्वांना विनंती करतो की, कोणताही राजकीय अथवा स्वतःचा स्वार्थ यांसाठी नागरिकांनी आरोग्याला धोका निर्माण होईल, असे वर्तन करू नये.’’