साहाय्यक पोलीस निरीक्षकावर जमावाकडून आक्रमणाचे प्रकरण

नावे देऊनही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचा पत्नीचा आरोप

पोलिसांवरील आक्रमणाविषयी पोलीसच कारवाई करण्यास निष्क्रीय असतील, तर सामान्यांवरील अन्यायाविषयी ते काय करत असतील ?, याची कल्पना येते. अशा निष्क्रीय पोलिसांविरुद्ध त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदवावी. – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नगर – बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांच्यावर अरणगाव (तालुका जामखेड) येथे चोर असल्याचा संशयातून जमावाने आक्रमण केले. कांबळे यांनी त्यातून जीव वाचवला ; मात्र या आक्रमणातील आरोपींची नावे देऊनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत. महत्त्वाच्या ठिकाणचे ‘सीसीटीव्ही फूटेज’ घेण्याकडेही ते दुर्लक्ष करत आहेत, तसेच पंचनाम्यातील त्रुटींकडेही त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच पोलीस निरीक्षकाची पत्नी अधिवक्ता पूनम यांनी आक्षेप घेतला असून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली आहे.