(म्हणे) ‘तालिबान्यांनी मर्यादेचे उल्लंघन केल्यावर कारवाई करू !’ – ट्विटर

ट्विटरकडून तालिबान्यांची खाती चालूच !

अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्रपत अमरुल्लाह सालेह यांचे खाते मात्र केले बंद !

तालिबान ही आतंकवादी संघटना असतांना तिच्या आतंकवाद्यांची खाती बंद करण्याऐवजी तिच्या विरोधात लढणार्‍या सालेह यांचे खाते बंद करून ट्विटरने तिची मानवताविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. जगभरातील मानवतावाद्यांनी ट्विटरवरच आता बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे ! – संपादक

नवी देहली – आम्ही तालिबान्यांच्या खात्यांवर सतत लक्ष ठेवून आहोत. त्यांनी मर्यादांचे उल्लघंन केल्यावर  त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ट्विटरने म्हटले आहे.  (‘आतंकवाद्यांना कोणती मर्यादा असते का ?’ अशी वक्तव्ये करून ट्विटरने तालिबानप्रेम व्यक्त केले आहे ! – संपादक)   तालिबान्यांच्या खात्यांवर बंदी घालण्यास टाळाटाळ करणार्‍या ट्विटरने अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्रपती आणि तालिबान्यांच्या विरोधात तेथील अफगाणी सैन्याला संघटित करणारे अमरुल्लाह सालेह यांची सर्व ट्विटर खाती बंद केली आहेत. सालेह सध्या पंजशीर प्रांतात वास्तव्य करत असून या प्रांतावर अद्याप तालिबानला नियंत्रण मिळवता आलेले नाही.

तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याचे खाते अद्याप चालू असून त्याचे ३ लाखांहून अधिक अनुयायी (फॉलोअर्स) आहेत. दुसरा प्रवक्ता सुहैल शाहीन याचेही खाते चालू असून त्यालाही ३ लाखांहून अधिक अनुयायी आहेत, तर यूसुफ अहमदी याच्या खात्याचे ६० सहस्र अनुयायी आहेत.

फेसबूक आणि यू ट्यूब यांनी तालिबान्यांच्या खात्यांवर ‘तालिबानी आतंकवादी संघटना आहे’, असे सांगत यापूर्वीच बंदी घातली आहे.