पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या लिखाणाचा सन्मान केला, तसेच त्यांच्या इतिहासावर आक्षेप घेणार्या टीकाकारांना अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याविषयी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर सामाजिक माध्यमांतून विरोध करत ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी जातीवाचक टीका केली. त्यानंतर मनसेचे वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडला प्रत्युत्तर देत राज ठाकरे काय कळणार ? लायकीत रहायचे अन्यथा पुण्यात फिरणे मुश्कील करू, अशी चेतावणी दिली.
त्यानंतर पुन्हा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी पुणे कुणाच्या बापाचे नाही. छत्रपतींची बदनामी करणार्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून लोटांगण घातले म्हणजे पुष्कळ मोठे झालो अशा भ्रमात राहू नका, अशी असंबद्ध टीका केली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संभाजी ब्रिगेडच्या वक्तव्याला किंमत देऊ नये, असे म्हणत संभाजी ब्रिगेडच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.