अन्य कंत्राटदाराचा दावा
मुंबई – मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जुन्याच कंत्राटदाराला भंगार विक्रीचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेची ५ कोटी रुपयांची हानी झाली आहे, असा दावा अन्य कंत्राटदाराने केला आहे; मात्र प्रशासनाने दावा फेटाळून लावला.
महापालिकेने जुन्या मोठ्या लोखंडी जलवाहिन्यांचे तुकडे भंगारात देण्यासाठी कंत्राट दिले आहे. अनुमाने एक लाख किलो वजनाचे हे भंगार आहे. या विक्रीतून पालिकेला ३२ कोटी २६ लाख ७९ सहस्र रुपये मिळणार आहेत. या कंत्राटातून ३२ कोटीहून अधिक रक्कम मिळू शकते, असा दावा अन्य कंत्राटदाराने केला आहे.
एका कंत्राटदाराने पालिका आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या कंत्राटामागे काहीतरी घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. दोन वर्षांसाठी भंगाराचा दर प्रशासनाने ठरवलेला आहे. त्यानुसारच हे कंत्राट देण्यात आलेले आहे. दोन वर्षांत पालिकेच्या विविध विभागांत जो काही भंगाराचा माल निघेल, त्याची विल्हेवाट लावण्याचे काम या कंत्राटदाराचे आहे. त्यामुळे पुनर्निविदा काढण्याची आवश्यकता नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.