सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. ८ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ इतकेच ध्येय ठेवून मनुष्याला अपयशाच्या वाटेवर नेणारे आधुनिक शिक्षण !’ यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/497580.html

(भाग ६)

पू. डॉ. शिवकुमार ओझा

४. आधुनिकतेने ग्रासलेल्या युवकांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करू न शकणे

आजकालचे सध्याचे विद्यार्थी काहीही प्रश्न विचारतात. प्रश्नांचे, त्यांचे योग्य उत्तर न मिळाल्यामुळे त्यांना आपल्या विश्वासामध्ये काहीच चुकीचे वाटत नसल्याचे दिसून येते. अशाच काही प्रश्नांविषयीचे विचार प्रस्तुत पुस्तकामध्ये देण्यात आले आहेत.

५. आधुनिक युगाची भौतिक प्रगती ही प्रत्यक्ष प्रमाण, मानसिक अनुमान आणि तर्क यांवर आधारित असणे

आधुनिक जीवनात ज्ञानेंद्रियांद्वारे (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांद्वारे) काही पदार्थांचे प्रत्यक्ष स्वरूप जाणून घेऊन त्या आधारे काही अन्य पदार्थांचेसुद्धा मानसिक अनुमान (Guess) काढले जाते. त्याची सत्यता पारखण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण आणि तर्क यांचा आधार घेतला जातो. प्रत्यक्ष ज्ञानासाठी प्रयत्न केले जातात. आधुनिक युगाची समस्त भौतिक प्रगती ही प्रत्यक्ष प्रमाण, मानसिक अनुमान आणि तर्क यांवर आधारित आहे. त्या आधारे उत्तरोत्तर भौतिक उपकरणे किंवा भौतिक सुविधा यांचा शोध लागला आहे. येथे प्रत्यक्ष प्रमाणाव्यतिरिक्त तर्कालासुद्धा अत्यंत महत्त्व दिले गेले आहे.

याच तीन मूलभूत साधनांद्वारे प्राप्त ज्ञानाला इंग्रजी भाषेत ‘सायन्स’ (Science) म्हटले जाते. हिंदीत त्याचे भाषांतर ‘विज्ञान’ असे होते. हे विज्ञान वास्तवात इंद्रियार्थ विज्ञान आहे, म्हणजे मनुष्याच्या इंद्रियांद्वारे जाणून घेतलेले विज्ञान आहे.

६. आधिभौतिक आणि आध्यात्मिक प्रणाली

आधुनिक वैज्ञानिक प्रत्यक्ष पदार्थाचे परीक्षण करून त्यातून काही तत्त्वे किंवा सिद्धांत निर्धारित करतात. ही आधिभौतिक प्रणाली आहे. याला मर्यादा (Limitations) असतात. प्राचीन भारतीय प्रणालीद्वारे अनुभवांचे परीक्षण करून त्याद्वारे काही तत्त्वे किंवा सिद्धांत निश्चित केले जातात. ही आध्यात्मिक प्रणाली आहे,. ती आधिभौतिक प्रणालीपेक्षा अधिक विस्तृत आणि गूढ आहे.

७. ज्ञान आणि त्याचे ४ प्रकार

आधुनिक शिक्षण प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान यांवर आधारित असल्यामुळे आपल्या ज्ञानाला मर्यादित करते. अंतःकरणाच्या वृत्तीसुद्धा ज्ञान प्रदान करतात. ज्ञान चार प्रकारचे असते – प्रत्यक्ष, परोक्ष, अपरोक्ष आणि साक्षात् अपरोक्ष. या चार प्रकारच्या ज्ञानांची विस्तृत चर्चा या पुस्तकामध्ये करण्यात आली आहे.

८. न्यायदर्शनातील ४ प्रमाणे

ज्ञानप्राप्तीच्या साधनांना ‘प्रमाण’ म्हटले गेले आहे. प्रमाणांच्या विषयात विस्तृत चर्चा महर्षि गौतम प्रणित ‘न्याय दर्शन’ नावाच्या ग्रंथात केली आहे. न्याय दर्शनात ४ प्रमाणे सांगितली आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि आप्त प्रमाण. या प्रमाणांचे संक्षिप्त विवरण प्रस्तुत ग्रंथामध्ये दिले आहे.

९. ज्ञानप्राप्ती होणे आणि त्यातील टप्पे  

अ. ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांद्वारे रूप, श्रवण, गंध, स्वाद आणि स्पर्श या वृत्तींच्या रूपातच प्राप्त होत नाही, तर प्रत्यक्ष अंतःकरणाच्या (मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार) विविध वृत्तंींद्वारेसुद्धा प्राप्त होते.

आ. ज्ञान केवळ जागृतावस्थेमध्येच होत नाही, तर स्वप्नावस्था आणि सुषुप्तावस्था यांचे अनुभवसुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची संधी देतात.

इ. तपाद्वारे चेतना विशाल करूनसुद्धा आम्हाला ज्ञान प्राप्त होते, अतींद्रिय ज्ञान आणि सिद्धी प्राप्त होतात.

ई. ज्ञान आम्हाला कधी कधी अकस्मात्सुद्धा मिळते. त्याला ‘प्रतिभाज्ञान’ असे म्हणतात. ते अपरोक्ष रूपाने होते.

१०. ज्ञान आणि ज्ञानाची साधने यांविषयी पूर्णतेचा अभाव

आमच्या चित्तात पुनर्जन्मातील कोणकोणते संस्कार आहेत ? ते केव्हा उदयास येतील ? आणि कशा प्रकारचे अनुभव प्रतिपादित करतील ? हे सांगणे शक्य होत नाही; म्हणून आमच्या अनुभवांचे क्षेत्र हे केवळ ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त अनुभवांच्या तुलनेत अत्यंत विशाल आणि गूढ आहे. आधुनिक काळात आपण सर्व आपल्या मर्यादित ज्ञान आणि मर्यादित ज्ञान-साधने यांना आधार करून जीवन-व्यतीत करत आहोत, म्हणजेच ज्ञान आणि ज्ञानाची साधने यांविषयी पूर्णतेचा पुष्कळच अभाव आहे. त्यामुळे आधुनिक जीवनात दिसून येणारी अपूर्णता आणि विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झालेले जीवन यात आश्चर्य वाटायला नको !

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक

(साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)