पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावरील आक्रमणासाठी भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांनी साहाय्य केले ! – दोघा विदेशी पत्रकारांच्या पुस्तकात दावा

  • विदेशी पत्रकारांना जी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या भारतीय गुप्तचरांना कशी मिळत नाही कि ही माहिती जाणीवपूर्वक दडपण्यात आली आहे, हे देशातील जनतेला समजले पाहिजे ! – संपादक
  • अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्‍यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ? – संपादक

नवी देहली – पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी होते. या भ्रष्ट अधिकार्‍यांनी आक्रमणापूर्वी तळावर पाळत ठेवली होती. त्यांपैकी एकाला तळाकडे जाणारा निर्जन मार्ग सापडला. त्याचा वापर आक्रमणकर्त्या आतंकवाद्यांनी दारूगोळा, ग्रेनेड, मोर्टार आणि एके -४७ रायफली नेण्यासाठी केला होता, असा दावा एड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या २ पत्रकारांनी त्यांच्या ‘स्पाय स्टोरीज : इनसाइड द सीक्रेट वर्ल्ड ऑफ द ‘रॉ’ अँड द आय.एस्.आय.’ या पुस्तकात केला आहे.

२ जानेवारी २०१६ या दिवशी या तळावर आक्रमण झाले होते. भारतीय सैन्याच्या गणवेशात आलेल्या आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले होते. ते भारत-पाकिस्तान सीमेवरील रावी नदीच्या मार्गाने आले होते. भारतीय सीमेमध्ये पोचल्यावर आतंकवाद्यांनी काही वाहने चोरली आणि ते पठाणकोट वायूदलाच्या तळाच्या दिशेने गेले. वायूदलाच्या तळाची भिंत ओलांडून, गवतातून ते सैनिक रहात असलेल्या ठिकाणी पोचले. येथे झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले आणि ३ सैनिक हुतात्मा झाले. दुसर्‍या दिवशी बॉम्बस्फोटात आणखी ४ भारतीय सैनिक हुतात्मा झाले. ‘परिस्थिती पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणाखाली आहे’ याची निश्‍चिती करण्यासाठी सुरक्षादलांना ३ दिवस लागले.

सुरक्षाव्यवस्थेविषयी सूचना देऊनही हलगर्जीपणा !

या पत्रकारांनी म्हटले आहे की, वारंवार चेतावणी देऊनही भारताने सुरक्षाव्यवस्था भक्कम केली नाही. पंजाबच्या ९१ कि.मी.पेक्षा अधिक सीमेवर कुंपण घालण्यात आलेले नाही. कमीतकमी ४ अहवालांमध्ये ‘नद्या आणि नाले घुसखोरीसाठी संवेदनशील असू शकतात’, असे सुचवण्यात आले होते; परंतु त्याविषयी कृती करण्यात आली नव्हती. या संवेदनशील सूत्राविषयी ६ वेळा लेखी सांगूनही तेथील गस्त वाढवण्यात आली नव्हती. पाळत ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला नाही.

भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांनी पाळत ठेवली !

या आक्रमणासाठी भारतातच ३५० किलो स्फोटके खरेदी केली गेली. यासाठी जैश-ए-महंमदने पैसे दिले. स्थानिक पोलीस अधिकार्‍यांसह आतंकवाद्यांच्या भारतीय साथीदारांवर वायूदलाच्या तळाची पाळत ठेवल्याचा संशय होता. यांपैकी एका पोलीस अधिकार्‍याने अशा क्षेत्राचा शोध घेतला जेथे सुरक्षाव्यवस्था कमकुवत होती. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये चित्रीकरण होत नव्हते. तेथे देखरेख करण्यासाठी कोणतीही उपकरणे नव्हती. या पोलीस अधिकार्‍याने साहाय्य केल्यामुळेच आतंकवादी ५० किलो दारूगोळा, ३० किलो ग्रेनेड, मोर्टार आणि एके -४७ रायफली वायूदलाच्या तळात नेऊ शकले.