हिंदु जनजागृती समितीचे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !
पुणे – येथील विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, पोलीस आणि शिक्षण विभाग येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस ठाणे, दत्तवाडी पोलीस ठाणे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे या सर्व कार्यालयांत जाऊन निवेदने देण्यात आली. तसेच पुणे येथील पोलीस अधीक्षक (ग्रामीण), हवेली (पुणे) आणि दौंड येथील तहसीलदार या सर्वांना संगणकीय पत्राद्वारे निवेदने पाठवण्यात आली.
शिक्षणाधिकारी, माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण पुणे, महानगरपालिका यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुणे यांच्या वतीने पुणे क्रीडाप्रमुख राजेंद्र ढुमणे यांनी निवेदन स्विकारले. समितीच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपचिटणीस श्रीमती शुभांगी गोंजारे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन स्विकारले, तसेच विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त मितेश गठ्ठे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन संपूर्ण वाचल्यावर योग्य ते आदेश काढले जातील, असे त्यांनी सांगितले. या वेळी धर्मप्रेमी रामनाथ सदभैय्या, मनोहरलाल उणेचा आणि हिंदु जनजागृती समितीचे कृष्णा पाटील उपस्थित होते.