सेंट जेसिंतो बेटावर १५ ऑगस्ट या दिवशी नौदलाने ध्वजारोहण करण्यास तेथील ख्रिस्त्यांचा विरोध

सेंट जेसिंतो बेट

पणजी, १३ ऑगस्ट (वार्ता.) – सेंट जेसिंतो या बेटावर नौदलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यास बेटावर रहाणार्‍या ख्रिस्ती ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे बेट ही खासगी मालमत्ता आहे. जर ध्वजारोहण करण्याची आवश्यकता असेल, तर ते ग्रामस्थच करतील, अशी त्यांची भूमिका आहे. नौदलाच्या अधिकार्‍यांनी ‘बेटावर ध्वजारोहण करण्याविषयी केंद्रशासनाचा आदेश आहे’, असे ग्रामस्थांना भेटून सांगितले होते. त्यावर ग्रामस्थांनी त्यांना ‘चर्चच्या फादरची अनुमती घेतली आहे का ?’, असे विचारल्यावर त्यांनी अनुमती घेतली असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात अनुमती घेतली नव्हती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याविषयी बेटावरील एक रहिवासी म्हणाले, ‘‘या बेटावर ध्वजारोहण करतो, असे सांगण्यासाठी नौदलाचे अधिकारी आले होते. केंद्रशासन किंवा गोवा शासन आमचे बेट कह्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर तसे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही कुणालाही ध्वजारोहण करण्यास देणार नाही.’’ दुसरे एक रहिवासी म्हणाले, ‘‘जर ध्वजारोहण करायचे असेल, तर ते आम्ही करू.’’