६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ३ वर्षे ६ मास) हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चोपडा, जळगाव येथील चि. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ३ वर्षे ६ मास) हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. रुद्राणी प्रशांत पाटील एक आहे !

सात्त्विकतेची आवड, शिकण्याची वृत्ती, शांत अन् स्थिर असे विविध गुण असलेली चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. रुद्राणी पाटील (वय ३ वर्षे ६ मास) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १७ डिसेंबर २०२० या दिवशी घोषित केले. तिचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. रुद्राणी पाटील

१. गर्भारपण

१ अ. ‘बाळाच्या जन्मापूर्वी आम्ही सहकुटुंब हरिद्वार येथे जात असतांना देहली येथील लाल किल्ल्यास भेट दिली. त्या वेळी आम्हाला लाल किल्ल्यासमोरच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर आमच्या कुटुंबात मला आणि माझ्या लहान भावाला अशी आमच्या घरात दोन कन्यारत्ने जन्माला आली.’ – श्री. प्रशांत पाटील (चि. रुद्राणीचे वडील), चोपडा, जळगाव.

१ आ. ‘चि. रुद्राणीच्या वेळी मला आणि माझ्या यजमानांना बेंगळुरू येथील एका साधकांच्या घरी गुरुदेवांच्या अमृत महोत्सवाचे थेट प्रक्षेपण पहाता आले. ३ दिवस पहायला मिळालेल्या या कार्यक्रमातून मला चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळाली.

१ इ. मला बेंगळुरू येथील सनातनच्या सेवाकेंद्राजवळ असलेल्या श्रीविष्णूच्या मंदिरात अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी सलग ७ दिवस मंदिरात होणार्‍या गायत्रीयागाच्या चैतन्याचा लाभ घेता आला.

१ ई. या कालावधीत नामजप, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकल्यावर गर्भातील बाळ प्रतिसाद द्यायचे आणि त्या वेळी माझा नामजपही अधिक भावपूर्ण होऊन अनेक वेळा माझी भावजागृती होत असे.’

– सौ. जागृती पाटील (रुद्राणीची आई), चोपडा, जळगाव.

श्री. प्रशांत पाटील

२. जन्म ते सहा मास

अ. ‘रुद्राणी जेव्हा दीड मासाची होती, त्या वेळी तिला श्री भवानीदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले असतांना तेथील पुजार्‍यांनी तिला देवीच्या चरणांजवळ ठेवले. त्या वेळी अचानक मूर्तीवरील फूल तिच्या अंगावर पडले आणि ती त्या फुलाशी खेळत होती.

आ. ती जन्मापासून दिवसा किंवा रात्रीच्या वेळी कधीही रडली नाही. तिने कधी त्रासही दिला नाही. ती नामजपाच्या यंत्राकडे एकटक बघत खेळत असे.

३. वय ६ मास ते १ वर्ष

अ. रुद्राणीला जवळ घेऊन श्रीकृष्णाचा नामजप केल्यावर तिला आनंद होऊन ती हसायची.

आ. ती प.पू. भक्तराज महाराज यांची भजने किंवा आरती म्हटल्यावर आनंदाने टाळ्या वाजवायची.

इ. आम्ही तिच्यावर मोरपिसाने आध्यात्मिक उपाय करत असतांना तिला पुष्कळ आनंद होत असे.

ई. मी तिला घेऊन देवीच्या मंदिरात गेले असता तिने हात जोडून देवीला नमस्कार केला.

४. वय १ वर्ष ते अडीच वर्षे

४ अ. सेवाभाव : तिला काही सेवा करायला सांगितल्यावर ती लगेचच ऐकते. ती कुठलीही सेवा परिपूर्ण करते.

सौ. जागृती पाटील

४ आ. प्रेमभाव : ती तिचा आवडता पदार्थ खात असतांना तिच्याकडे तो कुणी मागितला, तर ती लगेच देते. यावरून तिच्यात असलेला प्रेमभाव दिसून येतो.

४ इ. पूजा करतांना शांत आणि स्थिर रहाणे : आश्विन नवरात्रीमध्ये तिचे ‘कुमारिका पूजन’ करतांना ती शांत आणि स्थिर होती. तिच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवत होते.

४ ई. शिकण्याची वृत्ती : सकाळी मी (चि. रुद्राणीची आई) प्राणायाम करत असतांना तीसुद्धा माझ्यासमवेत प्राणायाम आणि व्यायाम करते. ती डोळे बंद करून हात जोडून भावपूर्ण ‘ॐ’चे उच्चारण करते. रुद्राणी कुठलीही कृती पाहिल्यावर लगेच तसे करण्याचा प्रयत्न करते. यावरून लहानपणातच तिच्यात असलेली शिकण्याची वृत्ती लक्षात येते.

४ उ. धर्माचरण करणे : ती घरात येणार्‍या स्त्रियांना, तसेच घरातील व्यक्तींनाही कुंकू लावते. ती प्रतिदिन सकाळी उठल्यावर श्रीकृष्णाच्या चित्राला, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांना आणि कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना डोके टेकवून नमस्कार करते.’

– सौ. जागृती पाटील आणि श्रीमती कुसुम पाटील (रुद्राणीची आजी)

४ ऊ. सात्त्विकतेची आवड

१. ‘आम्ही तिला घेऊन बाहेर गेलो असता रस्त्यावर कुठेही मंदिर दिसल्यावर ती लगेचच हात जोडून नमस्कार करते आणि आम्हालाही नमस्कार करायला सांगते.

२. तिला सात्त्विक ठिकाणी रहायला आवडते. ती आश्रमात किंवा मंदिरात आनंदी, शांत आणि स्थिर असते. विवाह, इतर समारंभ किंवा नातेवाईक यांच्याकडे गेल्यावर ती चिडचिड करते आणि रडते. तेथे ती अधिक वेळ थांबत नाही.

४ ए. आध्यात्मिक उपाय करणे : तिला सनातन सात्त्विक उत्पादनांची पुष्कळ आवड आहे. तिला दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा उदबत्ती दिसल्यास ती लगेच स्वतःचे आवरण काढते आणि इतरांचेही काढते. तिला अत्तराचे उपाय करायला पुष्कळ आवडते. ती उदबत्तीची विभूती दिसल्यास संपूर्ण अंगाला लावते आणि इतरांनाही त्याचा टिळा लावते. मी नामजपाला बसल्यावर ती माझ्याजवळ येऊन कापूर आणि अत्तर यांचे आध्यात्मिक उपाय करते अन् इतरांनाही उपाय करायला सांगते.

४ ऐ. रुद्राणीकडे पाहून शांत आणि स्थिर वाटते. तिच्याकडे पाहून ‘तिचे सतत देवाशी अनुसंधान आहे’, असे वाटते.

४ ओ. देवाविषयी भाव : रुद्राणीला श्रीकृष्णाला नमस्कार करायला सांगितल्यावर ती डोळे मिटून भावपूर्ण नमस्कार करते. तेव्हा तिला पाहून भावजागृती होते. तिला मंदिरात जायला पुष्कळ आवडते. आमच्या येथील मंदिराच्या बाहेर शिवाचे मोठे भित्तीपत्रक (‘फ्लेक्स’) आहे. ते पाहिल्यावर ती लगेच रस्त्यावरच डोके टेकून नमस्कार करते. ती दिवसभरातून अनेक वेळा श्रीकृष्णाच्या चित्राला आणि गुरुदेवांच्या छायाचित्राला डोके टेकवून नमस्कार करते. घरातील व्यक्ती नामजपाला बसल्यावर ती कुणालाही त्रास देत नाही अन् तीसुद्धा तेथे बसून मुद्रा करून नामजप करते.

४ औ. प्राण्यांविषयी प्रेमभाव : तिला गायीशी खेळायला पुष्कळ आवडते. ती गायीच्या डोक्यावरून हात फिरवते. गायीला चारा खाऊ घालते. मग गायसुद्धा तिला चाटते.

४ अं. स्वतःच्या चुकांची जाणीव : तिच्याकडून काही चूक झाली किंवा मोठ्याने बोलले गेले, तर ती लगेच कान पकडून क्षमा मागते.’

– सौ. जागृती पाटील, श्रीमती कुसुम पाटील आणि कै. अशोक पाटील (चि. रुद्राणीचे आजोबा, ५ एप्रिल २०२१ या दिवशी त्यांचे निधन झाले. ), चोपडा, जळगाव.

४ क. रुद्राणीचे जाणवणारे स्वभावदोष : हट्टीपणा आणि चिडचिड करणे’

– सौ. जागृती पाटील, चोपडा, जळगाव. (३०.६.२०२०)