कोरोनाच्या लसींचा काळाबाजार करणार्यांवर कठोर कारवाई केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक
संभाजीनगर – सरकारी केंद्रातील कोरोनाची लस चोरून कामगार वस्तीत प्रत्येकी ३०० रुपयांना विक्री करणारे आरोग्यसेवक गणेश दुराळे यांच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. उद्योगातील कामगारांचे लसीकरण ऑगस्ट मासापूर्वी पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आल्यानंतर कामगार पुरवठादार कंत्राटदाराला गाठून साजादपूर भागातील एका खोलीत लस विक्रीचा काळाबाजार चालू होता. त्यानंतर येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी लसीकरण केंद्रातील वैद्यकीय अधिकारीही सहभागी असू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहरात लसीकरणासाठी मोठमोठ्याच्या रांगा असतांना ग्रामीण भागात मात्र त्याचा काळाबाजार होत आहे.