मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० वाजता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे चर्चा झाली. या भेटीविषयी भाजप किंवा मनसे यांच्याकडून अद्याप काही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही; मात्र वर्ष २०२२ मध्ये होणार्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता यातून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे परप्रांतियांच्या विरोधातील धोरण मान्य नसल्याचे म्हटले होते. मुंबई महानगरपालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपच्या केवळ २ जागा अल्प निवडून आल्या होत्या; मात्र शिवसेनेसमवेत असलेल्या युतीमुळे राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने महापौरपदाची मागणी केली नव्हती; मात्र ‘मनसेसमवेत युती झाल्यास मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवता येईल’, या शक्यतेमुळे ही भेट झाल्याची शक्यता आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले, “राजकारणात काय होईल, हे आता सांगू शकत नाही; पण राजकारणात कधीही काहीही होते, हे निश्चित आहे.’’