कोल्हापूर, ४ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातून वाहने कर्नाटकात जातांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वाहनचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असली तरी प्रवेश न देता केवळ आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी असल्यासच प्रवेश देण्यात येत आहे. याच समवेत कर्नाटक प्रशासनाने गडहिंग्लज, शेडून, शंकरवाडी, तसेच कोगनोळी सीमाभागांत जाणार्या नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. याउलट कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्या वाहनांना कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. याच्या निषेधार्थ शिवसैनिक ५ ऑगस्टला सकाळी १० वाजता कर्नाटक सीमेवर कर्नाटक राज्यातून येणारी वाहने अडवणार आहेत, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे. याविषयी प्रशासनाने लक्ष घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवाजी जाधव उपस्थित होते.