शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन !

कोरोनाच्या निर्बंधांमुळे भक्तांनी शेगाव येथे न येण्याचे संस्थानचे आवाहन

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील

शेगाव – येथील श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त, आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ, ‘श्रीं’च्या विचारांना अनुसरून माणुसकी धर्म निभावण्यासाठी आयुष्य वेचणारे कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील (वय ८२ वर्षे) यांचे ४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भवासीय आणि भक्त यांच्यावर शोककळा पसरली आहे. गेल्या ४ दिवसांपासून ‘मल्टीऑर्गन फेल्युअर’मुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांनी ‘मला कुठल्याही रुग्णालयात हालवू नका’, असे सांगितल्याने त्यांच्यावर रहात्या घरी आधुनिक वैद्य हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार चालू होते. आयुर्वेदतज्ञ वैद्य गजानन पडघान हेही त्यांच्यावर आयुर्वेदाचे उपचार करत होते. शिवशंकरभाऊ यांचा रक्तदाब अल्प झालेला असून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. ‘कोरोनाच्या निर्बंधांमुळे भक्तांनी शेगाव येथे येऊ नये’, असे आवाहन संस्थानने केले आहे. गेल्या २ दिवसांत काही संत आणि अनेक मान्यवर यांनी शंकरभाऊ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. पुणे येथे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना, तसेच मंदिरात अभिषेक करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवडमधील श्री शनैश्वर ट्रस्टच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी अभिषेक करण्यात आला होता. ‘शिवशंकरभाऊ यांना दीघार्युष्य लाभो, त्यांची प्रकृती लवकर बरी होवो’, यासाठी गावोगावी भक्तांकडून प्रार्थना करण्यात येत होती. शेगावमधील अनेक व्यावसायिकांनी स्वतःची प्रतिष्ठाने बंद ठेवून पाटील यांच्या निधनाविषयी दुखवटा पाळला.

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा परिचय !

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० या दिवशी झाला होता. त्यांची श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी ३१ ऑगस्ट १९६२ नियुक्ती झाली होती. ते वर्ष १९६९ ते वर्ष १९९० पर्यंत ते संस्थानच्या अध्यक्षपदी होते. वर्ष १९८१ ते २२ जून १९९० पर्यंत व्यवस्थापकीय विश्वस्त आणि अध्यक्ष अशा दोन्ही पदांचा कार्यभार त्यांच्याकडे होता. वर्ष १९८१ ते आजअखेर ते श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यरत होते. संस्थानचे अध्यक्षपद आणि शेगावचे माजी नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. शेगाव संस्थान उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. साधी रहाणी आणि शिस्त यांमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. व्यवस्थापन करतांना त्यांनी मंदिराचा कोणताही लाभ घेतला नाही. शिवशंकरभाऊ यांनी ‘पद्म’ पुरस्कार विनम्रपणे नाकारला होता.

‘श्री गजानन महाराज संस्थान’ आदर्शवत् होण्यामागे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे नेतृत्व कारणीभूत ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

अनेक ठिकाणी मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर त्यातील गैरकारभार समोर आले; मात्र महाराष्ट्रातील शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चा व्यवहार पारदर्शक असण्यामागे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे नेतृत्व कारणीभूत आहे. संस्थानचा कारभार आदर्शवत् होण्यामागे विश्वस्त शिवशंकर पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. ते केवळ विश्वस्त म्हणून नव्हे, तर सेवक म्हणून भूमिका बजावत होते. शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला प्रखरपणे विरोध केला होता. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला त्यांचा नियमित पाठिंबा होता.