मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांनी दिल्या घोषणा !

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

सांगली, २ ऑगस्ट (वार्ता.) – महापुराने आलेल्या हानीची पहाणी करण्यासाठी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री आयुर्विन पुलावरून बाजारपेठेत आले होते. त्या वेळी भाजपचे कार्यकर्ते आणि काही संघटना यांचे कार्यकर्ते निवेदन देणार होते; मात्र मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यावर प्रचंड गर्दी झाली अन् वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्र्यांना वेढा दिला.

त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. हे पाहून शिवसैनिकांनीही घोषणा दिल्या. त्यामुळे एकूणच मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांनी घोषणा दिल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली. मुख्यमंत्री आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाविषयी नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. पोलीस अथवा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याचे दिसून आले.