रामनाथी (गोवा) – ‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे आत्मोद्धाराचा दिव्य मार्ग दाखवणार्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातनच्या साधकांना साक्षात् ‘मोक्षगुरु’ लाभल्याने केवळ गुरुपौर्णिमेचा दिवसच नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचेच दिवस असतात. त्यामुळे गुरुपौर्णिमा होऊन गेली, तरी ‘मोक्षगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अजून काय करू ?’, याच भावात सर्व साधक असतात. ४ दिवसांपूर्वीच गुरुपौर्णिमा झाली असल्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनुभवलेल्या गुरूंच्या कृपावर्षावात चिंब भिजलेले साधक अजूनही भावानंदातच आहेत. गुरुकृपेने त्यात भर पाडणारे दिव्य क्षण आषाढ कृष्ण पक्ष तृतीयेला (२६ जुलै २०२१ या दिवशी) ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांनी अनुभवले. सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार आणि पूर्णवेळ साधना करणारे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले. ‘परिस्थिती स्वीकारणे, स्थिरता, आनंदी आणि क्षात्रवृत्ती या गुणांचा संगम असलेले अन् पत्नीची सेवा मनापासून करून गुरूंचे मन जिंकलेले केसरकरकाका जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.
या मंगलप्रसंगी अधिवक्ता केसरकर यांच्यासमवेतच त्यांच्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पत्नी सौ. प्रमिला केसरकर याही उपस्थित होत्या. या वेळी अधिवक्ता केसरकर यांची मोठी कन्या सौ. नीलम नाईक, जावई श्री. समीर नाईक, तसेच धाकटी कन्या कु. उमा केसरकर हे संगणकीय प्रणालीद्वारे जोडले गेले होते. अधिवक्ता केसरकर यांच्यासमवेत सेवा करणारे काही साधकही संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अधिवक्ता रामदास केसरकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करताच अधिवक्ता केसरकर यांनी त्यांच्या प्रगतीचे श्रेय श्रीगुरुचरणी अर्पण केले. या वेळी त्यांचा भावही जागृत झाला होता.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अधिवक्ता केसरकर यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
१. साधनेचे प्रयत्न वाढवल्याने पुन्हा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे
‘केसरकरकाका यांनी याआधीही साधनेचे प्रयत्न करून ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. आध्यात्मिक त्रास आणि वाईट शक्तींची आक्रमणे वाढल्यामुळे, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे प्रयत्न अल्प पडल्याने त्यांची पातळी न्यून झाली होती; पण त्यांनी गेल्या काही मासांमध्ये साधनेचे प्रयत्न वाढवून पुन्हा ती आध्यात्मिक स्थिती साध्य केली. ‘काका प्रगती करणार’, हे निश्चितच होते; पण काळ आणि वेळ देवाने ठरवली होती. आपले त्रास, तसेच प्रारब्ध जन्मोजन्मीचे आहेत. केवळ गुरूंच्या कृपेनेच त्यावर मात करण्यासाठी साधकाकडून आतून प्रयत्न होतात.
२. अनेक वर्षे ‘गुरुसेवा’ म्हणून रुग्णाईत पत्नीची सेवा करणे
रुग्णाईतांची सेवा करणे कठीण असते; कारण ‘रुग्णाला काय हवे ?’, हे जाणून त्याप्रमाणे त्यांना साहाय्य करावे लागते. अनेक साधकांचा रुग्णाईत साधकांची सेवा करतांना मनाचा संघर्ष होतो. ‘गुरुसेवा’ या भावाने रुग्णसेवा केली की, ईश्वरच योग्य ते विचार आतून सुचवतो. केसरकरकाकांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते ‘गुरुसेवा’ या भावानेच त्यांच्या रुग्णाईत पत्नीची सेवा करतात. सेवा करतांना कधीच त्यांची चिडचिड होत नाही किंवा ते अस्थिर होत नाहीत. पत्नीच्या सेवेसाठी ते अन्य कुणाचे साहाय्यही कधीच घेत नाहीत. असे असले, तरी ते नेहमी आनंदी असतात.
३. प्रतिकूल काळातही सर्व परिस्थिती स्वीकारणे
काका ज्या परिस्थितीला सामोरे गेले, ते केवळ भगवंतच जाणू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या प्रतिकूल काळात काकूंना रुग्णालयात घेऊन जाणे, कित्येक काळ तेथे रहाणे कठीण आहे; पण काकांनी ती परिस्थिती स्वीकारली.
४. तत्परतेने आणि आपुलकीने सर्व सेवा करणे
काका सांगितलेल्या सेवा तत्परतेने पूर्ण करतात. त्यांना दिलेली वेळ उलटून गेली, असे कधीच झाले नाही. आश्रमस्तर, संस्थास्तर, तसेच साधकांच्या वैयक्तिक स्तरावरील अडचणी ते तेवढ्याच आपुलकीने सोडवतात.
अधिवक्ता केसरकर यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत१. पूर्वीपेक्षा अधिवक्ता केसरकर यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण न्यून झाले आहे ! – सौ. प्रमिला केसरकर (पत्नी) ‘माझ्या मनात विचार यायचा, ‘श्री. केसरकर पुष्कळ सेवा करतात; पण त्यांची प्रगती का होत नाही ?’ तेव्हा ‘स्वभावदोष आणि अहं यांमुळे प्रगती होत नसेल’, असा विचार माझ्या मनात यायचा. ‘वेळ आल्यावर प्रगती होईल’, असेही वाटायचे. पूर्वीपेक्षा त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण न्यून झाले आहे. २. सौ. नीलम नाईक (मोठी कन्या), फोंडा, गोवा ‘या मासात बाबांचा प्रत्यक्ष संपर्क झाला नाही; पण कालच भ्रमणभाषवर त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती होत आहे’, असे जाणवले होते.’ ३. श्री. समीर नाईक (जावई), फोंडा, गोवा ‘काकांशी बोलतांना ‘त्यांना काही त्रास अथवा अडचण आहे’, असे कधीच वाटत नाही. ते कधीच अस्थिर होत नाहीत.’ ४. आईच्या आजारपणात बाबांमध्ये समजूतदारपणा आणि सहनशीलता यांचे प्रमाण पुष्कळ असल्याचे प्रकर्षाने अनुभवले ! – कु. उमा केसरकर (मुलगी), ठाणे ‘वर्ष २०१६ पासून आईचे आजारपण चालू आहे. आईच्या आजारपणाच्या कालावधीत बाबांमध्ये समजूतदारपणा आणि सहनशीलता यांचे प्रमाण पुष्कळ असल्याचे प्रकर्षाने अनुभवले. आईची सेवा करण्यासाठी इतरांचे साहाय्य घेण्याविषयी, तसेच ‘मी साहाय्यासाठी काही दिवस येऊ का ?’, असे मी त्यांना विचारत असे; पण त्यांनी कधीच कुणाचे साहाय्य न घेता स्वत:हून आईचे सर्व केले. ‘मी मुलगी आहे, तर मी साहाय्य करायला हवे’, अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नाही. कालच विचार आला होता की, आईच्या आजारपणाच्या स्थितीमध्ये देवाला काय शिकवायचे आहे ? आज संगणकीय प्रणालीवरून जोडण्याचा निरोप मिळाल्यावर ‘देव बाबांची प्रगती झाल्याची आनंदवार्ता देईल’, असा विचार आला.’ |
परिस्थिती स्वीकारल्याने आनंद मिळत असल्याने साधकांनी हा गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
अधिवक्ता रामदास केसरकर यांनी भावपूर्ण व्यक्त केलेले मनोगत !
‘केवळ गुरूंची कृपा असल्यामुळे हे शक्य झाले आहे. गुरूंचे बळ नसेल, तर आपण काहीच करू शकत नाही. आमची काहीच क्षमता नाही. गुरुच सर्व करू शकतात. त्यांच्या कृपेने काहीही होऊ शकते. गुरुदेवांनी एकदा सांगितले होते की, परिस्थिती स्वीकारली की आनंद मिळतो. हे लक्षात घेऊन हा गुण वाढवण्यासाठी सर्व साधकांनी प्रयत्न करायला हवेत.’
सौ. प्रमिला केसरकर म्हणजे ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’चे प्रत्यक्ष उदाहरण !- श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ‘सौ. केसरकरकाकूंचे नाव ऐकूनसुद्धा छान वाटते. त्या अखंड भावावस्थेत असतात. त्यांची (आध्यात्मिक) प्रगती चांगल्या प्रकारे चालू आहे. त्या बोलतांना, तसेच त्यांच्याकडे पाहूनही आनंद होतो. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’, याचे त्या प्रत्यक्ष उदाहरण आहेत. अधिवक्ता केसरकर यांच्या प्रगतीविषयी त्यांची पत्नी सौ. प्रमिला केसरकर यांना मिळालेली पूर्वसूचनाया वेळी अधिवक्ता केसरकरकाका म्हणाले, ‘‘आदल्या दिवशी सत्संगाचा निरोप मिळाला, तेव्हा ‘सौ. प्रमिला यांची प्रकृती बरी नाही, तर त्यांना कसे घेऊन जायचे ?’, असा विचार आला. तेव्हा सौ. प्रमिला म्हणाल्या, ‘तुमची पातळी (६१ टक्के आध्यात्मिक पातळी) घोषित होणार असेल !’’ |
क्षणचित्र
अधिवक्ता केसरकरकाका यांच्या मनोगतानंतर अकस्मात् पावसाची जोरात सर आली. त्या माध्यमातून जणू ‘वरुणदेवतेचा कृपाशीर्वाद’च सर्वांवर झाल्याचे सर्वांना प्रकर्षाने जाणवले.
|