पाकमधील आतंकवादी संघटना अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नियंत्रणातील भागात होत आहेत स्थलांतरित !

  • भारताने अफगाणिस्तान शासनाला सैनिकी साहाय्य करून या आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
  • पाकमध्ये असतांनाच या आतंकवाद्यांवर भारताने कारवाई केली असती, तर त्यांचा सोक्षमोक्ष लागला असता !

काबुल (अफगाणिस्तान) – पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांनी त्यांचे तळ पाकमधून अफगाणिस्तानमध्ये स्थलांतरित केले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तान सरकारने भारताला देऊन सतर्क केले आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ८५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळवल्याने आता पाकमधील आतंकवादी संघटना त्याच्या आश्रयाला जात आहेत, असे यातून लक्षात येत आहे.

१. अफगाणिस्तानने सांगितले की, पाक त्याच्या देशातील सर्व आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना आणि गट यांना त्याच्या भूमीवरून हटवू इच्छित आहे. त्यांना तो अफगाणिस्तानमध्ये पाठवू इच्छित आहे. त्यातून तो ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफ्.ए.टी.एफ्.च्या) करड्या सूचीतून (एफ्.ए.टी.एफ्.च्या निकषानुसार आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य करणार्‍या देशांना करड्या किंवा काळ्या सूचीत टाकले जाते.) बाहेर येऊ शकेल, असे त्याला वाटते. (पाकने असे कितीही प्रयत्न केले, तरी ते भारताने उघडे पाडावेत आणि पाकला काळ्या सूचीत टाकण्यासाठी प्रयत्न करावा ! – संपादक)

२. काही आठवड्यांपूर्वीच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी उघडपणे सांगितले होते की, पाकमधील १० सहस्र जिहादी आतंकवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. तसेच तालिबानचे लष्कर-ए-तोयबा, अल् कायदा आणि जैश-ए-महंमद यांच्याशी चांगले संबंध आहेत, असेही म्हटले होते.

३. गनी यांनी पुढे म्हटले होते की, तालिबान अफगाणिस्तानला आतंकवाद्यांचा स्वर्ग बनवू इच्छित आहे; पण आम्ही असे होऊ देणार नाही.

४. अफगाणिस्तानमध्ये ठार झालेल्या आतंकवाद्यांकडे पाकिस्तानी ओळखपत्रे सापडली आहेत. तसेच तालिबानी आतंकवाद्यांवर पाकमधील रुग्णालयांमध्ये उपचारही चालू आहेत.