मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे ऑनलाईन ‘गुरुप्राप्ती शिबिर’ चैतन्यमय वातावरणात पार पडले !
मुंबई – ईश्वराचे पृथ्वीवरील सगुण साकार रूप म्हणजे श्रीगुरु ! कुठल्याही मार्गाने साधना करत असतांना गुरुकृपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘गुरुविण नाही दुजा आधार ।’ जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते, तसे गुरु जीवनात आल्यावर साधक किंवा शिष्य यांचे जीवन आमूलाग्र पालटते. शिष्याच्या जीवनातील असमाधान आणि दु:ख दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये आनंद, तसेच भक्तीचा ओलावा निर्माण होतो. अशा थोर गुरूंप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला समजलेली साधना आणि मिळालेले ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता आहे. त्यासाठी सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त समष्टी साधनेत खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया, असे चैतन्यमय मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील जिज्ञासूंसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित ऑनलाईन ‘गुरुप्राप्ती शिबिरा’त त्या मार्गदर्शन करत होत्या. या शिबिराचा एकूण २५१ जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी काही जिज्ञासू आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक यांनी ते करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयी मनोगत व्यक्त केले. सनातन संस्थेच्या गुजरातमधील साधिका सौ. ऋचा सुळे यांनी विहंगम प्रसाराची विविध माध्यमे आणि सत्सेवेविषयीच्या सूत्रांविषयी उपस्थितांना अवगत केले. शिबिराचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या सौ. सोनाली पोत्रेकर यांनी केले.
जिज्ञासूंचे अनुभवकथन !
१. श्री. गिरीश ढवळीकर, पनवेल – नामजप आणि सेवा यांमधील साधनेची पातळीही समजली. सद्गुरु (कु.) अनुराधाताईंचे मार्गदर्शन ऐकल्यावर अधिक सेवारत होण्यासाठी उत्साह वाढला. असे सत्संग आणि सद्गुरूंचे मार्गदर्शन सतत लाभल्याने साधना मार्गावर अधिक पुढे जाता येईल, हे जाणवले.
२. सौ. मीना वास्के, ठाणे – माझ्या संसारात, तसेच साधनेत पुष्कळ अडचणी होत्या; पण नामजप आणि सेवा केल्यामुळे त्या अडचणी कशा सुटल्या, हे कळलेच नाही.
३. सौ. श्रद्धा विजय नारकर, मीरा रोड, पालघर – सध्याच्या कठीण परिस्थितीत मनाची स्थिरता कशी ठेवायची, ते मी सत्संगातून शिकले. याविषयी मी घरातील सगळ्यांना सांगितले. त्यामुळे मनःस्थिती स्थिर होती आणि देवावरची श्रद्धा अधिक दृढ झाली.
४. सौ. तन्वी कानडे, परळ, मुंबई – मार्गदर्शन ऐकून सेवेची गोडी निर्माण झाली आहे. मी प्रतिदिन सेवा करण्याचे नियोजन केले आहे.
५. सौ. मीरा डिचोलकर, मुलुंड, मुंबई – गेल्या वर्षीच्या दळणवळण बंदीच्या काळात मी सनातनशी जोडले गेले. सध्या मी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसार आणि समाजात साधना सांगणे अशा सेवा चालू केल्या आहेत. माझी मुलगीही सनातनच्या वतीने घेण्यात येणारे बालसंस्कारवर्ग ऐकते. ती तिच्या मैत्रिणींना ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ डाऊनलोड करायला सांगते. मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सनातनची ‘संस्कार वही’ भेट म्हणून दिली. त्यामुळे काही जण स्वतःहून वह्यांची मागणी देत आहेत.
६. सौ. सरिता लोखंडे, ऐरोली, नवी मुंबई – सनातनच्या वतीने घेण्यात येणारी ‘ऑनलाईन’ प्रवचने आणि कार्यक्रम यांचे निमंत्रण मी माझ्या नातेवाइकांना पाठवते. ‘त्यातून उपयुक्त माहिती मिळाली’, असे अनेकांनी कळवले.