गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

२ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंच्या उपस्थितीत कर्नाटक राज्यामध्ये पू. रमानंद गौडा यांचे चैतन्यमय वाणीतून मार्गदर्शन पार पडले !

पू. रमानंद गौडा

बेंगळुरू (कर्नाटक) – गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून समर्थ रामदासस्वामी यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही भ्रष्टाचार, अत्याचार, हिंदूंच्या देवतांचे विडंबन, गोहत्या, लव्ह जिहाद, आतंकवाद अशा अनेक संकटांनी हिंदु धर्माला घेरले आहे. अशा परिस्थितीत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्मावर होत असलेले आघात आणि अन्याय यांविषयी समाजात जागृती करत आहेत. धर्मशिक्षण देण्यासह समाजाला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शन करत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्यातील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. कर्नाटक राज्यातील जिज्ञासूंसाठी ‘गुरूंचे महत्त्व आणि गुरु-शिष्य परंपरेची महानता’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने पू. रमानंद गौडा यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाच्या वेळी कर्नाटक राज्यातून २ सहस्र ५९५ जण सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यावर पुढील अर्ध्या घंट्यात १५ सहस्र ४९० जिज्ञासूंनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानंतर १८९ जिज्ञासूंनी धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली.

जिज्ञासूंचे अभिप्राय

१. श्री. नंजुंडेगौडा, बेंगळुरू : ‘हे मार्गदर्शन प्रतिदिन ऐकले पाहिजे’, असे वाटते. या प्रवचनाने माझ्या मनाला शांतता लाभली.

२. श्री. शिवप्रसाद, अभियंता, मैसुरू : पूजनीय संतांचे मार्गदर्शन पुष्कळ चांगले होते. असे सत्संग आजच्या समाजाला आणखी अधिक प्रमाणात हवे आहेत.

३. श्री. जगदीश, मडिकेरी : मी वेगवेगळ्या संघटनांमध्ये सहभागी असूनही मला समाधान मिळाले नाही. ४-५ मासांपूर्वी सनातन संस्थेत आल्यानंतर मला शांतता आणि समाधान मिळाले आहे. मी साधना करीन आणि सर्वांना त्याविषयी सांगीन.

४. अधिवक्ता विजय उमाकांत, भद्रावती : गुरूंविषयी इतकी चांगली माहिती मी कधीच ऐकली नव्हती. पू. रमानंद गौडा गुरूंविषयी सांगत असतांना मनाला पुष्कळ आनंद होत होता.