कायदा तोडून मंदिरात प्रवेश करणार्‍या गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याऐवजी पोलिसांनी कार्यकर्त्यावर गुन्हा नोंदवला !

नाशिक पोलिसांचा अजब आणि दुटप्पी कारभार !

जितेंद्र आव्हाड

मुंबई – सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेशबंदी असतांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकमधील आनंदवली येथील नवश्या गणपति मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन आरती केली. या प्रकरणी पोलिसांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा न नोंदवता ५ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला आहे.

जितेंद्र आव्हाड २ दिवसांपूर्वी नाशिक दौर्‍यावर असतांना या मंदिरात जाऊन त्यांनी आरती केली होती. याची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणी भाजपच्या आध्यात्मिक समितीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी ‘आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवावा किंवा सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेश द्यावा’, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे; मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आव्हाड यांच्यावर गुन्हा न नोंदवता मंदिरात उपस्थित असलेल्या अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. योगेश दराडे, स्वप्नील चिंचोले, विक्रांत सांगळे, संतोष काकडे आणि आनंद घुगे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यापूर्वी ठाणे येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी श्री. अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण झाल्याप्रकरणी करमुसे यांनी आव्हाड यांच्या विरोधात तक्रार केली होती; मात्र या प्रकरणीही ठाणे येथील पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा न नोंदवता अन्यांवर गुन्हा नोंदवला. त्यामुळे श्री. अनंत करमुसे यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.