करहर (सातारा) येथील श्री विठ्ठल मंदिराला पोलीस छावणीचे स्वरूप !

भाविक विठुरायाच्या दर्शनापासून वंचित

सातारा, २१ जुलै (वार्ता.) – आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील करहर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसराला २० जुलै या दिवशी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विठ्ठल मंदिर परिसरासह बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे या वेळी जिल्हावासियांना करहर येथील विठुरायाचे दर्शन घेता आले नाही. करहर या ठिकाणी पंचक्रोशीतील गावोगावच्या दिंड्या येतात; मात्र या वेळी जिल्हा प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आले होते. तसेच जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दल यांच्या तुकडीने परिसर कह्यात घेतल्याने करहरमध्ये नागरिकांपेक्षा पोलीस अधिक संख्येने दिसत होते. ७० हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

करहर नगरातील श्री विठ्ठल मंदिरात आतंकवादी येणार होते का ? – विलासबाबा जवळ, व्यसनमुक्त युवक संघ

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ म्हणाले, ‘‘आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये श्री विठ्ठलाची महापूजा झाली. तेथे ४० ते ५० जणांचा समूह होता. राज्यात प्रत्येक ठिकाणी विठूनामाचा गजर चालू आहे; मात्र करहर येथे जिल्हा प्रशासनाने कहरच केला. संपूर्ण मंदिर परिसर ‘सील’ करून पोलिसांचा खडा पहाराच ठेवला. गत २ दिवसांपासून नेत्यांचे कार्यक्रम, तसेच प्रशासनाच्या बैठका होतात. तेथे गर्दी चालते. तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही; परंतु वारकर्‍यांच्या दर्शनानेच कोरोना पसरतो का ? करहर या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने जो अतिरेक केला आहे, त्यामुळे आमच्या श्रद्धेवर घाला घातला गेला आहे.  करहर नगरातील श्री विठ्ठल मंदिरात आतंकवादी येणार होते का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; परंतु काळ सोकावता कामा नये. यासाठी वारकर्‍यांनी जागृत होऊन संघटित होणे आवश्यक आहे.’’