नुकताच इयत्ता १० वीचा निकाल घोषित झाला. कोरोनामुळे यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले. त्यात ९०० हून अधिक मुलांना १०० टक्के, तर ८० सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर गुण देण्यात आले. यामुळे शिक्षणाच्या टक्केवारीवरच प्रश्नचिन्ह उठू लागले. परीक्षेच्या टक्केवारीचा दर्जा राखणे आवश्यक आहे; कारण पात्रता नसूनही एखाद्याला जर चांगले गुण मिळाले, तर तो विद्यार्थी भरकटत जाऊन पात्रता असणार्या विद्यार्थ्याला मागे टाकू शकतो. यातून प्रामाणिक विद्यार्थी निराशेत जाऊ शकतो, अशी शक्यता यंदा घेतलेल्या परीक्षा प्रक्रियेमुळे निर्माण झाली आहे. याची परिणती अनेक नव्या समस्यांमध्ये होऊ शकते.
यातील एक समस्या म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १० पदांच्या जागांसाठी लाखो अर्ज आले होते. यावरून बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे लक्षात येते. यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी शैक्षणिक मूल्याची घसरण हेही एक कारण आहे. शैक्षणिक मूल्य ढासळल्यामुळे आज पात्रता नसलेल्यांकडेही पदव्या आहेत. ज्यांनी कष्ट घेऊन पदवी मिळवली, त्यांच्या बरोबरीने ते उभे आहेत. टक्केवारीच्या फुगवट्यामुळे गुणवत्ता अल्प असलेले विद्यार्थीही विविध क्षेत्रांत नोकर्या मिळवतात. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
यावर उपाययोजना म्हणून दळणवळण बंदीच्या काळात चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ वर्गांमध्ये नीतीमूल्यांचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून ऑनलाईन परीक्षा देणारी पिढी स्वतःशी प्रामाणिक राहून परीक्षा देईल. यामुळे टक्केवारीचा दर्जाही राखला जाईल. तसेच पुस्तकीय ज्ञानासमवेत घरकामात साहाय्य कसे करावे ? स्वतःत चांगले गुण आणून वाईट दोष कसे घालवावेत ? हेही शिकवले गेले पाहिजे. तरुण पिढीला रोजगारामध्ये स्वयंसिद्ध करण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी. प्रादेशिक परिस्थिती केंद्रीभूत ठेवून रोजगाराची निवड करायला हवी. त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. सरकारने अशा प्रकारचे पालट करावेत, हीच अपेक्षा !
– श्री. जयेश बोरसे, पुणे