पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

१. ‘वारकरी’ हा शब्द ‘वारीकरी’ या शब्दाचा अपभ्रंश. वारी करणारा तो वारकरी

भागवताचार्य वा.ना. उत्पात

२. संत वाङ्मयात केलेले वारीचे उल्लेख 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी शेकडो वर्षे पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानोबारायांनी एका अभंगात लिहिले आहे, ‘माझ्या आई-वडिलांनी मला आणि भावंडांना पंढरीच्या वारीसाठी नेले.’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून गेली साडेसातशे वर्षे वारीचे उल्लेख संत वाङ्मयात शेकडो वेळा आढळतात. ‘संत नामदेवांनीही संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सिदोपंत हे लग्न झाल्यावर पंढरपूरला दर्शनासाठी आले. त्या वेळी पंढरपूर येथे यात्रा भरली होती’, असे म्हटले होते.

३. वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्ये

अ. वारकरी संप्रदाय हा वारकरी भागवत संप्रदाय, भक्तिसंप्रदाय आहे.

आ. पंढरीची नित्य वारी, गळ्यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्या ग्रंथांचे वाचन, पठण, नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्णुता, सदाचार, शाकाहार आणि व्यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.

इ. पंढरीचा विठ्ठल आणि रुक्मिणीमाता हे वारीचे मुख्य दैवत आहे.

ई. वारीमध्ये चालत असतांना वारकर्‍यांची ‘एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती’ ही धारणा असते.

उ. तुळशीची माळ हे तर वारकर्‍यांचे यज्ञोपवीत आहे.

३ ऊ. ‘डोईवरचे आकाश आणि मनातील देवयानीशी प्रवाही झालेले पसायदान म्हणजे वारी’, असे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सांगणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे ऐश्वर्य आहे. भेदातीत जीवनाची एक गतीमान आवृत्ती आहे. वारी हे मूलतः एक व्रत आहे. तिला दैवी गुणसंपदेचे अधिष्ठान आहे. वारी हा तीर्थरूप महाराष्ट्राचा वडिलोपार्जित वारसा आहे. डोईवरचे आकाश आणि मनातील देवयानीशी प्रवाही झालेले पसायदान म्हणजे वारी ! खरोखर वारकरी धर्माची आचारसंहिता नागरिकत्वाची उंची वाढवणारी आहे.’’

४. संत नामदेव यांनी केलेले वारीचे वर्णन, तिचे महत्त्व आणि वारी करण्याचे फळ

अ.

नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरूषन सर्वकाळ ।।
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठ्ठल एकाएकी सुखरूप ।।

– संत नामदेव महाराज

आ. संत नामदेव यांनी लिहिलेल्या आरतीतील वारीचा उल्लेख

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ।।

इ. संत नामदेव यांच्या अभंगातील वारीचे महत्त्व !

‘आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ।।’
‘टाळ नृत्य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ।।’
‘कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरीसी ।।’
‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।’
‘नामा म्हणे धन्य झाले ते संसारी । न सांडिती वारी पंढरीची ।।’

(साभार : संत नामदेव महाराजांच्या अभंगातील निवडक ओळी)

ई. संत नामदेव महाराज यांनी पंढरीची वारी करण्याचे सांगितलेले फळ

‘पंढरीची वारी करील जो कोणी । त्याच्या मागे पुढे चक्रपाणी ।।’
‘पंढरीसी जावे जीवन्मुक्त व्हावे । विठ्ठला भेटावे जीवलगा ।।’

(साभार : संत नामदेव महाराजांच्या अभंगांतील निवडक ओळी)

५. अन्य संतांनी अभंगाद्वारे केलेले वारीचे वर्णन

अ. संत जनाबाई म्हणतात,

‘आले वैष्णवांचे भार । झाले हरिनाम जागर ।।’
‘ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळा ।।’

(साभार : संत जनाबाईंच्या अभंगांतील निवडक ओळी)

आ. संत नरहरी सोनार म्हणतात,

पंढरी नगरी दैवत श्रीहरि । जाती वारकरी व्रतनेमें ।। १ ।।

आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथें ।। २ ।।

– संत नरहरी सोनार

इ. संत सेनामहाराज म्हणतात,

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे ।। १ ।।

वाट धरता पंढरीची । चिंता हरे संसाराची ।। २ ।।

– संत सेनामहाराज

ई. तेराव्या शतकातील विठ्ठलाचे अनन्यभक्त संत चोखामेळा यांच्या अभंगातील वारीचा उल्लेख

‘टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ।।’
‘कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायावरी भाळ माझा ।।’ 

(संदर्भ : संत चोखामेळा यांच्या अभंगातील निवडक ओळी)

उ. नाथांचे पणजोबा संत भानुदास वारीविषयी लिहितात,  

आमुचे कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठ्ठलाचे ।।

– संत भानुदास महाराज

ऊ. भागवतोत्तम संत एकनाथ वारीचा महिमा गातात,

पंढरीची वारी आहे ज्याचे घरी । तोचि अधिकारी धन्य जगीं ।।

– संत एकनाथ गाथा, अभंग १६७९, ओवी १

धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनी मात धन्य त्याची ।।

– संत एकनाथ गाथा, अभंग १६७९, ओवी ३

‘वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ।।’

– संत एकनाथ महाराज

ए. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।’
‘पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ।।
पुंडलिका दिला वर । करूणाकर विठ्ठले ।।’

(साभार : संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील निवडक ओळी)

६. वारकर्‍यांनी पुढील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे !

अ. मी सदा सत्य बोलीन.

आ. मी परस्त्री मातेसमान मानीन.

इ. काही अपराध घडला, तर श्री विठ्ठलाचे चरणांवर हात ठेवून मी स्वीकृती देईन आणि क्षमेची याचना करीन.

ई. मी नित्य शुद्ध सात्त्विक आहार शाकाहार घेईन.

उ. मी वर्षातून एकदा पंढरी, देहू आणि आळंदीची वारी करीन.

ऊ. मी एकादशीचे व्रत करीन.

ए. मी ‘रामकृष्ण हरि’ या मंत्राचे प्रतिदिन १०८ वेळा पठण करीन.

ऐ. मी ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकारामांची गाथा’ हे तीन ग्रंथ नियमित वाचीन.

ओ. मी प्रतिदिन हरिपाठ करीन आणि त्याविना जेवणार नाही.

औ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ‘पसायदान’ म्हटल्याविना मी जेवणार नाही.

अं. मी नेमाने स्नान झाल्यावर गोपीचंदनाच्या मुद्रा लावीन.

क. मी कपाळी बुक्का लावल्याविना व्यवहार करणार नाही.

ख. प्रपंचातील वाट्याला आलेले कार्य श्री विठ्ठलाच्या साक्षीने प्रामाणिकपणे पार पाडले कि नाही, हे सांगण्यासाठी मी प्रतिवर्षी वारीला जाईन.

ग. पूर्वी एक म्हण होती, ‘वारकरी वारीत पहावा. वारीत न दिसला, तर विठ्ठल चरणी रुजू झाला’, असे समजावे. मी हे पाळीन.

घ. मी वारीला आल्यावर चंद्रभागेचे स्नान करून नगरप्रदक्षिणा करीन.

च. मी वारीला आल्यावर नामस्मरण, सेवा, प्रवचन, भजन, कीर्तन आणि श्रवण करीन.

छ. मी भजनात आणि नामस्मरणात काळ घालवीन.’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर

(साभार : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक २०१४)