शिरोडा, फोंडा येथील कवी आणि साहित्यिक महेश पारकर लिखित ‘विचारविश्व’ पुस्तकाचे प्रकाशन
शिरोडा, १७ जुलै (वार्ता.) – पुस्तकातील ‘सनातन संस्थेची आवश्यकता आणि तिचे कार्य’ या विषयीच्या लेखात सनातन संस्थेविषयीची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. हिंदु धर्माला मूळ वैभव सनातन संस्थेच्या विचारधारेनुसार मिळू शकते. वास्तविक हे कार्य मठाधिपतींनी करायला पाहिजे होते आणि ते कार्य आता सनातन संस्था करत आहे. सनातन संस्थेच्या या कार्याला आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्री. गो.रा. ढवळीकर यांनी केले. शिरोडा, फोंडा येथील कवी आणि साहित्यिक महेश पारकर लिखित ‘विचारविश्व’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ जुलै या दिवशी येथील कमलाबाई हेदे विद्यालयाच्या सभागृहात झाले. त्या वेळी श्री. गो.रा. ढवळीकर यांनी पुस्तकाचे समीक्षण सांगतांना वरील प्रतिपादन केले. ‘गोमंतक साहित्य सेवक मंडळा’चे अध्यक्ष श्री. रमेश वसकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक श्री. महेश पारकर यांच्यासह सम्राट क्लबचे श्री. सूरज नाईक, श्री. प्रकाश नाईक, ‘आदर्श विद्याप्रसार मंडळ, शिरोडा’चे अध्यक्ष श्री. चंद्रकांत हेदे आणि सौ. दीपा मिरिंगकर हे उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर शिरोडा येथील कोरोनायोद्ध्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘सम्राट क्लब, शिरोडा’ यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. दीपा मिरिंगकर यांनी, तर आभारप्रदर्शन दयानंद नाईक यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रकवी आणि साहित्यिक महेश पारकर यांनी पुस्तकाच्या मनोगतात ‘हे पुस्तक सनातन संस्थेचे संस्थापक तथा परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे’, असे म्हटले आहे. |
‘विचारविश्व’ पुस्तकाविषयीश्री. महेश पारकर लिखित ‘विचारविश्व’ पुस्तकात वैचारिक लेखांचा संग्रह, प्रवासवर्णन आदींची माहिती आहे. पुस्तकात ‘सनातन संस्थेची आवश्यकता आणि तिचे कार्य’, ‘मेकॉले शिक्षणपद्धतीचा दुष्परिणाम’, ‘समान नागरी कायद्याचे महत्त्व’, ‘तस्लिमा नसरीन यांचा हक्कांसाठी क्रांतीकारी लढा’ आदी विषयांवर आधारित उपयुक्त असे लेख आहेत. त्याचप्रमाणे ‘ऋषिकेश’ तीर्थक्षेत्र आणि इतर ठिकाणच्या प्रवासांचे वर्णन आहे. |