‘१८.५.२०२६ या दिवशी बार्शी, जि. सोलापूर येथील सनातनचे साधक श्री. तानाजी गोरे यांच्या मातोश्री (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) यांचे निधन झाले. १६.६.२०२६ या दिवशी त्यांचे प्रथम मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री. अतुल केशव पवार, कोल्हापूर सेवाकेंद्र
१ अ. चांगली स्मरणशक्ती : ‘९२ व्या वर्षीही गोरेआजींची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांना लहानपणीचे अथवा आजवर घडलेले प्रसंग जसेच्या तसे आठवत असत. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावेही त्यांच्या स्मरणात असायची.

१ आ. सतर्कता : गोरेआजी खोलीत पलंगावर झोपून असायच्या. त्यांच्या बाजूच्या खोलीत कुणी हळू आवाजात बोलत असेल, तरीही आजींना व्यवस्थित ऐकू यायचे. त्यांना स्वतःहून उठता येत नसे, तरीही मुख्य प्रवेशद्वाराचा आवाज आल्यावर त्यांना लगेच ‘कुणीतरी आले आहे’, असे लक्षात यायचे.
१ इ. नामजपादी उपायांचे गांभीर्य : आजींना सांगितलेला नामजप त्या नियमित करत असत. त्या काही दिवसांनी ‘आता कोणता नामजप करायला हवा ? त्यात काही पालट आहे का ?’, असे तेथील साधकांना विचारून घेत असत.
१ ई. सतत अनुसंधानात असणे : ‘आजींच्या खोलीत भिंतीवर त्यांना दिसेल’, अशा पद्धतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र लावले होते. आजी त्या छायाचित्राकडे पाहून नामजप करत असत. आजी सतत अनुसंधानात असायच्या. त्यांना सूक्ष्मातील अनुभूतीही पुष्कळ येत होत्या.’

‘बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती सुभद्रा ज्ञानोबा गोरे यांना लहानपणापासूनच देवाची आवड होती. त्या कडक उपवास करून मनापासून व्रतवैकल्ये करत असत. आजींचे आयुष्य पुष्कळ खडतर होते. उतारवयात साधकांकडून साधना समजल्यावर त्यांनी साधनेला आरंभ केला. गोरेआजींना नामजप करण्याचे महत्त्व समजल्यावर शेतातील कामे करतांनाही त्या नामजप करू लागल्या. त्या अंथरुणाला खिळून असतांनाही सतत आनंदी असायच्या. त्यांच्या देवाप्रतीच्या भावामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’ -सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.६.२०२६)
२. सौ. मंदाकिनी केशव पवार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे), बार्शी, जि. सोलापूर.
२ अ. ‘कडक उपवास करणे अन् सोवळे-ओवळे पाळून मनापासून व्रतवैकल्ये करणे : ‘गोरेआजींना लहानपणापासूनच देवाची आवड होती. त्या विवाह करून सासरी आल्या. सासरी त्यांना पुष्कळ कष्टाची कामे करावी लागली. आजींचे आयुष्य पुष्कळ खडतर होते. त्यांना घरातील सर्व कामे करून शेतात जावे लागत असे. अशा स्थितीतही त्या कडक उपवास करत आणि सोवळे-ओवळे पाळून मनापासून व्रतवैकल्ये करत. आजी संकष्टी चतुर्थीला दिवसभर काहीही खात नसत. त्या संध्याकाळी शेतातून घरी आल्यानंतर विहिरीतील पाणी आणत असत. नंतर त्या अंघोळ करून देवपूजा करत असत. त्यानंतर आजी स्वयंपाक बनवून जेवण करत असत. अशा पद्धतीने त्यांनी पुष्कळ वर्षे उपवास केले.

२ आ. आजींना नातेवाइकांकडून ‘कुलदेवता आणि दत्त’ यांचे नामजप करण्याचे महत्त्व समजल्यावर त्या शेतातील कामे करतांनाही नामजप करत असत.
२ इ. सनातन संस्थेचा कोणताही कार्यक्रम असला की, त्या आवर्जून उपस्थित रहात होत्या. ‘सनातन संस्थेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला पुष्कळ आनंद जाणवतोे’, असे त्या मला सांगत असत.
२ ई. साधकांचे उत्साहाने आदरातिथ्य करणे : आजी पूर्वी त्यांच्या मूळ गावी हिंगणगाव, जिल्हा धाराशिव येथे रहात असत. नंतर त्या बार्शी येथे त्यांचा मुलगा श्री. तानाजी गोरे यांच्याकडे रहायला आल्या. अनुमाने १० – १२ वर्षांपूर्वी काही वेळा बाहेरगावचे साधक त्यांच्याकडे सेवेनिमित्त निवासाला असायचे. तेव्हा ‘आजी साधकांचे जेवण बनवणे, त्यांना प्रेमाने जेवायला वाढणे’, या गोष्टी त्या मनापासून करत होत्या. आजींचे वय अधिक असूनही त्या साधकांचे उत्साहाने आदरातिथ्य करत असत.
२ उ. सर्वांशी जवळीक साधणे : काही वेळा आजींच्या घरी सत्संग असायचा. तेव्हा त्या सर्व साधकांमध्ये गुरूंचे रूप पाहून सर्वांशी प्रेमाने बोलत असत. माझी आणि त्यांची पुष्कळ जवळीक होती. त्या माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत असत.
२ ऊ. त्या पुष्कळ वर्षे अंथरुणाला खिळून होत्या, तरीही त्या नेहमी आनंदी आणि उत्साही असत.
२ ए. धनाचा त्याग : आजींचे यजमान स्वातंत्र्यसैनिक होते. यजमानांच्या निधनानंतर आजींना निवृत्तीवेतन मिळत होतेे. त्या प्रतिमास नियमित अर्पण करत असत. त्या गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा अधिक अर्पण करत असत.
२ ऐ. गुरुदेवांप्रतीचा भाव : आजी नेहमी गुरुदेवांच्या विषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) बोलत असत. त्यांच्या बोलण्यातून गुरुदेवांप्रतीचा भाव जाणवत असे.
२ ओ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. आजींचे निधन झाल्यावर त्यांचा चेहरा निरागस, तेजस्वी आणि शांत दिसत होता.
२. ‘आजींची आध्यात्मिक प्रगती झाली असावी’, असे मला वाटले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.६.२०२६)
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !