सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट

१ अ. वर्ष १९८९ ते वर्ष २०१० : ‘मी उपाय शोधण्याच्या संदर्भात बुद्धीने प्रश्‍न विचारून उत्तर शोधत असे. याचे एक उदाहरण पुढीलप्रमाणे आहे. एखादा साधक ‘साधना नीट होत नाही, तर काय करू ?’, असे मला विचारायला आला, तर मी ध्यानात पुढीलप्रमाणे प्रश्‍न विचारून उत्तरे शोधत असे.

१ अ १. कारण शोधणे : तळमळ किंवा साधनेचे प्रयत्न अल्प असणे, वाईट शक्तींचा त्रास असणे, वाईट शक्तींमुळे अडथळा आला असल्यास तो त्या साधकाला स्वतःला असलेल्या त्रासामुळे आहे कि वास्तूमुळे आहे ? इत्यादी प्रश्‍न माझ्या मनात आणून त्याचे उत्तर ‘हो’ येईपर्यंत मी प्रश्‍न विचारत रहायचो.

१ अ २. उपाय शोधणे : कारण समजल्यावर त्यावर उपाय म्हणून ‘एखादा धार्मिक विधी करणे किंवा तीर्थक्षेत्री जाणे आवश्यक आहे का ? कोणत्या देवतेचा किंवा कोणत्या बीजमंत्राचा किती नामजप करायचा ? वास्तूशुद्धी, विभूतीचा वापर, मुद्रा, न्यास इत्यादींपैकी काय आणि किती वेळ करायचे ?’, यांविषयी मी खोलात जाऊन विचारत असे.

१ आ. वर्ष २०११ पासून आजपर्यंत : ‘कारण शोधण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी कितीही प्रश्‍न विचारले, तरी ते पुरेसे नाहीत’, हे माझ्या लक्षात आले; कारण ‘त्रासाची कारणे आणि त्यांवरील उपाय’, हे दोन्ही असंख्य असू शकतात. तेव्हापासून प्रश्‍न न विचारता मी माझे मन निर्विचार ठेवतो.

१ आ १. कारण शोधणे : मी मन निर्विचार ठेवल्यावर माझ्या डोळ्यांसमोर अनेक दृश्ये दिसतात, उदा. वाईट शक्तींकडून प्रक्षेपित होणारी अस्त्रे, आग इत्यादी. अशी दृश्ये दिसण्याच्या काही सेकंद ते काही मिनिटे या कालावधीवरून त्रास देणार्‍या वाईट शक्तीच्या सामर्थ्याची कल्पना येते. मला दृश्य काही सेकंद दिसल्यास ‘वाईट शक्तीचे सामर्थ्य अल्प आहे’ आणि काही मिनिटे दिसल्यास ‘वाईट शक्तीचे सामर्थ्य अधिक आहे’, असे माझ्या लक्षात येते.

१ आ २. उपाय शोधणे : उपाय शोधतांना मी माझे मन निर्विचार ठेवतो. मला त्रासाच्या कारणासंबंधी दृश्ये दिसणे थांबले की, उपायासंबंधी दृश्य दिसते, उदा. धनुष्याला लावलेला बाण, पंख्याची फिरणारी पाती इत्यादी. त्यावरून अनुक्रमे ‘श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांचा नामजप करणे आवश्यक आहे’, हे माझ्या लक्षात येते. (फिरणारा पंखा श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचे प्रतीक आहे.) त्यानंतर ‘तो नामजप किती घंटे करणे आवश्यक आहे ? त्यासाठी मुद्रा आणि न्यास कोणता करायचा ?’, हे माझ्या लक्षात येते. मी तसे साधकाला सांगतो. तेव्हा मला शांत झाल्यासारखे वाटते.’

(श्रावण शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (१९.८.२०१३))

२. वरील विषयाच्या संदर्भात श्री. राम होनप यांनी केलेले आध्यात्मिक विश्‍लेषण

श्री. राम होनप

२ अ. वर्ष १९८९ ते वर्ष २०१० : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९८९ ते वर्ष २०१० या कालावधीत ध्यानाद्वारे विशिष्ट अडचणीवर प्रश्‍न विचारून उत्तरे मिळवली. ही पद्धत ‘पृथ्वी आणि आप’ या तत्त्वांशी संबंधित आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी एखाद्याच्या समस्येविषयी अनेक प्रश्‍न ध्यानात ईश्‍वराला विचारणे, हे पृथ्वीतत्त्वाशी संबंधित होते. ‘त्या प्रश्‍नांचा उलगडा होणे आणि त्या समस्येवरील उपाय मिळणे’, हे आपतत्त्वाशी संबंधित होते.

२ आ. वर्ष २०११ पासून आजपर्यंत : वर्ष २०११ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर उपाय शोधण्यापूर्वी मन निर्विचार करतात. तेव्हा त्यांना विविध दृश्यांच्या माध्यमांतून एखाद्याला होणार्‍या त्रासाची कारणे आणि उपाय मिळतात. ही प्रक्रिया तेजतत्त्वाशी संबंधित आहे. तेजतत्त्वामुळे चांगली आणि वाईट दृश्ये दिसण्याची प्रक्रिया घडते.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना त्रासावर उपाय मिळाल्यावर शांत वाटण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘एखाद्याची समस्या सुटावी’, अशी तळमळ असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ध्यानाद्वारे त्या समस्येवरील उपाय मिळतो, तेव्हा त्यांना ‘त्या साधकाची समस्या सुटली’, या विचाराने शांत वाटते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी उपाय शोधल्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होणे आणि त्याचे कारण 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ध्यानाद्वारे उपाय शोधून साधकांच्या अडचणी दूर केल्यावर अशा साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होऊन ते परिणामकारक अध्यात्मप्रसाराचे कार्य करतात. त्यामुळे धर्मकार्य वाढीस लागते. परिणामी सप्तपाताळांतील वाईट शक्तींना अधर्माचे कार्य करण्यास प्रतिरोध होतो.

काही साधकांना वाईट शक्तीचा त्रास असतो. अशा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी नामजपादी उपाय शोधून दिल्यावर त्या वाईट शक्तीचा जोर न्यून होतो. त्यामुळे त्या वाईट शक्तीला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा राग येतो.

या कारणांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे कार्य अवतारी असून ते समष्टी कल्याणाचे आहे. त्यामुळे ते अशा वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांची कधीही पर्वा न करता ईश्‍वरी कार्य करत असतात.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या उपाय शोधून काढण्याच्या पद्धतीचे साधकांना होणारे लाभ

४ अ. समस्येचे मूळ कारण समजणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ध्यानाद्वारे साधकांच्या अडचणींमागील मूळ कारण शोधतात; कारण साधकांच्या अडचणी न सुटल्यास ‘साधकाच्या साधनेचा व्यय होणे आणि त्याच्या साधनेची गती अन् आध्यात्मिक प्रगती मंदावणे’, असे दुष्परिणाम घडतात. अशा अडचणींचे मूळ कारण समजल्यावर साधकाला त्यातून बाहेर पडणे सुलभ जाते.

४ आ. समस्येवर उपाय मिळाल्याने साधकाच्या साधनेची अनेक वर्षे वाचणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ध्यानाद्वारे साधकाची मूळ अडचण समजण्यासह ती अडचण सुटण्यासाठी करायच्या नामजपादी उपायांच्या संदर्भातही लक्षात येते. त्यामुळे साधकाच्या साधनेतील अडचणी अल्प कालावधीत न्यून होऊ लागतात. त्यामुळे त्याची साधना चांगल्या प्रकारे होऊन त्याला जलद आध्यात्मिक प्रगती साध्य करता येते. यात साधकाच्या साधनेची अनेक वर्षे वाचतात.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी उपाय शोधण्याच्या माध्यमातून साधकांवर कृपा करण्याची कारणे

अ. साधकांनी ईश्‍वरप्राप्तीसाठी जमेल तेवढा तन-मन-धन यांचा त्याग केला आहे. त्यामुळे ‘अशा साधकांना अडचणींतून लवकर मार्ग मिळावा’, अशी इच्छा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मनात निर्माण होते.

आ. काही साधकांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा असते. त्यानुरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने साहाय्य करतात.

इ. काही प्रसंगी साधकांच्या मागील जन्मांतील कर्मदोषांमुळे त्यांच्या चालू जन्मात साधनेत अनेक अडचणी निर्माण झालेल्या असतात. अशा साधकांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणे अवघड असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची साधकांवर प्रीती असल्याने ते निःस्वार्थ वृत्तीने अशा साधकांना नामजपादी उपाय सांगून अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २२.१.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : २५ सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.