(म्हणे) ‘आमचे पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याशी संबंध नाहीत !’ – तालिबान

अशा जिहादी आतंकवाद्यांवर कोण विश्‍वास ठेवणार ? कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, हे भारत कधी विसरू शकणार नाही !

सुहैल शाहीन

काबुल (अफगाणिस्तान) – आमचे पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (सदाचरणी लोकांची सेना) आणि जैश-ए-मंहमद (महंमदाची सेना) यांच्याशी कोणतेही संबंध नाहीत, असे स्पष्टीकरण तालिबानचा (‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’ ‘तालिब’चा अर्थ ‘ज्ञान मिळवण्याची अपेक्षा करणारे आणि इस्लामी कट्टरतावादावर विश्‍वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे.) प्रवक्ता सुहैल शाहीन याने दिले आहे. ‘या आतंकवादी संघटनांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अन्य देशांच्या विरोधात करण्यासाठी दिला जाणार नाही’, असेही शाहीन याने स्पष्ट केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हे स्पष्टीकरण दिले. काही प्रसारमाध्यमांनी ‘तालिबान आणि पाकमधील आतंकवादी संघटना एकत्र लढत आहेत’, असे वृत्त दिले होते. त्यावर तालिबानकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

(म्हणे) ‘भारताने निष्पक्ष रहावे !’ – तालिबान

शाहीन याने भारताच्या प्रतिनिधींची भेट घेतल्याचे वृत्तही या वेळी फेटाळून लावले. शाहीनने म्हटले, ‘आम्हाला आशा आहे की, भारत अफगाणिस्तानच्या प्रकरणी निष्पक्ष राहील.’ यापूर्वी अन्य एका मुलाखतीत शाहीन याने म्हटले होते की, भारत विदेशींनी स्थापन केलेल्या अफगाण सरकारची बाजू घेत आहे. भारत आमच्या समवेत नाही. जर तो अफगाण सरकारच्या समर्थनार्थ काम करत असेल, तर त्याने निश्‍चित चिंतेत रहावे. एक चुकीचे धोरण त्याचे रक्षण करू शकत नाही. आम्हाला आमच्या कमांडरांकडून अहवाल मिळाला आहे की, भारत अफगाण सैन्याला शस्त्रपुरवठा करत आहे. जर तो तालिबानशी चर्चा करू इच्छित आहे, तर अफगाण सैन्याला शस्त्रे कसे काय पुरवू शकतो ? हा विरोधाभास आहे. (भारताशी दरडावणार्‍या तालिबानला भारताने धडा शिकवावा ! – संपादक)