‘भाजीमंडई’ हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक ! बहुतांश सर्व जण दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणारा भाजीपाला, फळे वगैरे घ्यायला मंडईत जातात. ‘मंडईमध्ये सहसा मनासारखी ताजी-तजेलदार भाजी, रसरशीत फळे मिळत नाहीत. उपलब्ध असतील, तर बरेचदा त्यांच्या किंमती अधिक असतात’, असाच बहुतांश जणांचा अनुभव असतो. अशा वेळी ‘तुम्ही घरच्या घरी घरापुरती शेती करू शकता’, असे कुणी सांगितले, तर त्यावर आपला विश्वास बसणार नाही; पण ते शक्य आहे. घरापुरती शेती करण्यासाठी शेती किंवा अंगण असायला पाहिजेच, असे नाही. घरगुती शेती करण्यासाठी जागा ही समस्या नाही. अगदी घराच्या सज्जात (बाल्कनीमध्ये), गच्चीत (टेरेसवर) किंवा खिडकीतही अशा प्रकारची घरगुती शेती करणे शक्य आहे.
आगामी आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रयोगांची अतिशय आवश्यकता आहे. त्रिकालज्ञानी संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितल्याप्रमाणे आपत्काळाला आरंभ झाला असून पुढील ५-६ वर्षे महाभयंकर आपत्काळाला सामोरे जावे लागणार आहे. या वेळी आतासारखा मंडईमध्ये भाजीपाला उपलब्ध होऊ शकेल किंवा तेथे पोहोचता येईल, याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. आता कोरोनाच्या काळातच भाजीपाला मिळण्याच्या संदर्भात किती अडचणी आल्या, वस्तूंच्या किंमती किती वाढल्या हे अनेकांनी अनुभवले. अशा वेळी आपल्या घरातच घरापुरता भाजीपाला, फळे पिकवता येत असतील, तर त्यासाठी प्रयत्न का करू नये ? अशाने घरची सकस भाजीही मिळेल, तसेच पैसे आणि श्रम यांचीही बचत होईल. सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये आपण घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवायचा ? याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/495969.html
अ. घरगुती शेतीच्या अंतर्गत कोणती झाडे लावू शकतो ?
१. भाजीपाला आणि स्वयंपाक घरात उपयोगी : लाल माठ, अंबाडी, पालक, मेथी, कोथिंबीर, सिमला मिरची, मिरची, वांगी, कारले, पडवळ, दुधी भोपळा, भेंडी, कोबी, कांदे, बटाटे, टोमॅटो, गाजर, काकडी, बीट, मुळा, हादगा, शेवगा, कढीपत्ता, लिंबू, ऊस, पुदिना, लसूण, आले.
२. औषधी वनस्पती : तुळस, कोरफड, अडुळसा, ब्राह्मी, शतावरी, सब्जा
३. फळझाडे : संत्र, पेरू, लिंबू, पपई, आंबा, अंजीर
४. फुलझाडे : गुलाब, झेंडू, लिली, जमेली, जास्वंद, मोगरा आदी.
आ. कुंडीची निवड
गच्चीवर बागकाम करण्यासाठी कुंडी किंवा कंटेनर यांचा उपयोग करू शकतो. कुंडी शक्यतो निमुळती नसावी. कुंडीचा वरचा परीघ १२ इंचांचा असेल, तर तळ १० इंचांचा हवा. कुंडीचे काठ आतल्या बाजूला वाकलेले नसावेत. कुंडीचा आकार मडक्यासारखा नसावा. शक्यतो मातीची कुंडी घ्यावी. ती उपलब्ध नसेल, तर माठ, पत्र्याचा किंवा प्लास्टिकचा डबा, प्लास्टिकची बालदी, मोठी प्लास्टिकची पिशवी, प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकचे पूर्ण किंवा अर्धे कापलेले ड्रम, लाकडी चौकटी यांचाही आपण कुंडी म्हणजे ‘कंटेनर’ म्हणून वापर करू शकतो. गच्चीवर बागकाम करण्यासाठी नर्सरीमध्ये ‘ग्रो बॅग्ज’ मिळतात, त्याही वापरू शकतो. बाजारातही असे कंटेनर उपलब्ध असतात. आपण बाजारातून कंटेनर घेणार असू, तर ते फिकट रंगांचे घ्यावेत, जेणेकरून त्यामध्ये उष्णता अधिक खेचली जाणार नाही.
गच्चीवरील बागकामामध्ये बहुतांश झाडे कुंड्यांमध्ये उगवू शकतात. भाजीपाला किंवा ज्यांची मुळे छोटी आहेत, अशी रोपे छोट्या कुंडीत लावू शकतो. टोमॅटो, मुळा,गाजर यांसारखी झाडे मध्यम आकाराच्या कुंडीत लावावीत. मोठ्या झाडांसाठी मोठे कंटेनर किंवा प्लास्टिकचे / पत्र्याचे ड्रम (कंटेनर) आवश्यक असतात. उंच चढणार्या वेलींसाठी गच्चीची भिंत किंवा उभे पाईप्स यांचाही उपयोग करून घेऊ शकतो, ज्यामुळे उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर करता येईल.
इ. कुंडी किंवा कंटेनरला भोके पाडणे
हवा खेळती रहाण्यासाठी कुंडीला किंवा कंटेनरला भोके असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण प्लास्टिकची कुंडी असेल, तर त्या कुंडीला तळाशी ४-५ आणि आजूबाजूला १०-१२ असे साधारण ४-५ इंचाच्या अंतरावर भरपूर भोके पाडून घ्यावीत. प्लास्टिकचा डबा किंवा बादली वापरत असू, तर त्यालाही भोके पाडून घ्यावीत. बाजारात मिळणार्या ‘ग्रो बॅग्ज’ सहसा भोके पाडूनच मिळतात.
ई. कुंडी कशी भरायची ?
कुंडी भरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एकतर आपण आपल्याजवळ उपलब्ध होणारी माती कुंडीत घालू शकतो किंवा माती, कोकोपीट आणि खत यांचे मिश्रण माध्यम म्हणून वापरू शकतो अथवा मातीविरहित बागकामही करू शकतो. मातीविरहित बागकाम करतांना ओल्या आणि सुक्या कचर्यापासून (झाडाची सुकलेली पाने, काटक्या इत्यादी) बनणारे कंपोस्ट खत मातीला पर्यायी माध्यम म्हणून वापरले जाते.
ज्या मातीत सेंद्रिय कर्ब (कार्बन) अधिक असते, त्या मातीत सतत पाणी घालावे लागत नाही; कारण अशी माती पाणी धरून ठेवते. लाल मातीत अन्नद्रव्य अल्प असतात, तर पाण्याचा निचरा अधिक प्रमाणात होतो. याउलट काळ्या मातीत अन्नद्रव्य अधिक असतात आणि त्यातून पाण्याचा निचरा अल्प होतो. गच्चीवर बागकाम करतांना अन्नद्रव्ये अधिक आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते. आपण काळी माती वापरत असू, तर त्यामध्ये नदीकाठची किंवा इमारतीच्या येथील मूठभर वाळू धुऊन तीही घालावी.
आपण जर लाल माती वापरत असू, तर कोकोपीट (नारळाच्या भुश्यापासून बनवलेली नैसर्गिक आणि रोगकारक जीवाणूमुक्त भुकटी. ही भुकटी काही प्रक्रिया करून वीटेच्या आकारातही उपलब्ध करून दिली जाते.) वापरावे; कारण ते पाणी धरून ठेवते. आपले घर समुद्राजवळ असेल, तर कोकोपीट वापरण्याची आवश्यकता नाही; कारण समुद्राजवळील प्रदेशात वातावरणात बाष्प असते. त्यामुळे तेथे कोकोपीट वापरले, तर पाण्याचा अधिक अंश मिळून झाडे मरू शकतात.
सर्वप्रथम कुंडीच्या तळाशी नारळाच्या शेंड्या व्यवस्थित पिंजून टाकाव्यात. त्यावर सुक्या काड्या उभ्या खोचाव्यात. त्यानंतर त्यामध्ये दीड ते २ इंच सुक्या पानांचा (आपल्या आवारात असलेल्या झाडांच्या सुकलेल्या पानांचा थर) थर दाबून बसवावा आणि त्यावर माती घालावी. कुंडीच्या वरचा २ इंचांचा भाग सोडून द्यावा. मग रोप लावून पुन्हा सुक्या पानांचा थर बसवावा आणि त्यावर थोडे पाणी घालावे.
केवळ मातीऐवजी माती, कोकोपीट आणि खत यांचे एकत्रित मिश्रण करून ते माध्यम म्हणून वापरू शकतो. कोकोपीट ४ ते ५ घंटे पाण्यात भिजवून मग निथळून किंवा दोन्ही हातांनी दाबून त्यातील पाणी बाहेर टाकावे आणि ते मातीत मिसळावे. अशा प्रकारची माती कुंडीमध्ये भरून त्यामध्ये सुका कचरा किंवा कडुलिंबाची सुकलेली पाने यांचा थर द्यावा. अशा प्रकारे कुंडी भरून झाल्यावर त्यामध्ये आपण रोपे लावू शकतो किंवा बिया अंकुरण्यासाठी लावू शकतो.
(क्रमश:)
– संकलन : सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
साधकांना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !या लेखात सांगितल्याप्रमाणे काहीजण छतवाटिका करत असल्यास सर्वांना उपयुक्त होतील, अशी अनुभवातून शिकायला मिळालेली सूत्रे कळवा. तसेच येथे दिलेली छतवाटिकेची माहिती सहजरित्या करता येईल, अशा प्रकारातील आहे; पण अगदी कमी जागेत अधिक उत्पन्न घेता येणार्या ‘हायड्रोपोनिक्स’सारख्या काही पद्धतीही वापरल्या जातात. अशा अन्य काही पद्धती वापरून बागेचे प्रयोग केले असल्यास त्या पद्धतीची माहिती आणि अनुभव खालील पत्त्यावर कळवल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करता येतील. सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा पिन – ४०३४०१ भ्रमणभाष क्र. ७०५८८८५६१० संगणकीय पत्ता : [email protected] |