रिक्त पदे लवकर भरा !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (‘एम्.पी.एस्.सी.’ची) परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखती रखडल्याने आणि त्याचा परिणाम नोकरी मिळत नसल्याने पुणे येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने नुकतीच आत्महत्या केली. पैशांअभावी निर्माण झालेल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे पर्याय नसल्याने त्याने हा दुर्दैवी निर्णय घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. स्वप्नीलने घेतलेल्या निर्णयानंतर ‘सगळी सोंगे करता येतात; पण पैशाचे सोंग करता येत नाही’, या म्हणीची आठवण येते.

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सूत्र पावसाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडले. त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे’, असे सांगत ‘एम्.पी.एस्.सी.’ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यात तातडीने लक्ष घालून पुढील सर्व निर्णयप्रक्रिया गतीमान केली. अनेक मास मुलाखती रखडलेल्या असतांनाही एवढ्या अल्प कालावधीमध्ये आणि तडकाफडकी झालेला निर्णय ऐकल्यानंतर ‘सरकारने मनात आणले, तर काहीही होऊ शकते’, याचा प्रत्यय येतो. जर स्वप्नीलने आत्महत्या केली नसती, तर हे सूत्र अधिवेशनामध्ये आले असते का ? याचा अर्थ ‘सरकारी क्षेत्रातील प्रलंबित निर्णय पूर्ण होण्यासाठी कुणाचा तरी बळी जाणेच अपेक्षित आहे का ?’ असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

आज उच्चशिक्षित स्वप्नीलकडे शैक्षणिक गुणवत्ता असूनही सरकारच्या निर्णयक्षमतेच्या अभावामुळे त्याला जीव गमवावा लागला; परंतु असे अनेक जण आहेत की, ज्यांनी जीव दिला नाही; परंतु त्यांचा प्रतिदिन जीव जात आहे. वाढलेली महागाई, कोरोनाचे महाभयंकर संकट, स्पर्धा आणि सरकारची असंवेदनशीलता यांत जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधा न मिळणे यांमुळे अनेकांच्या जीवनातील समस्यांचे प्रमाण वाढलेले आहे. शासकीय स्तरावर अशी अनेक क्षेत्रे आहेत की, ज्यामध्ये अजूनही पदे रिक्त आहेत. या पदांसाठी सक्षम असणारे सरकारच्या नियोजनाच्या अभावामुळे वंचित आहेत. त्यामुळे कामेही रखडली आहेत. ‘सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून विविध क्षेत्रांतील रिक्त पदे भरण्याचा निर्णय गतीमानतेने घ्यावा’, हीच अपेक्षा !

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.