नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या संदर्भात गेल्या दीड वर्षातील अनुभवानुसार एक गोष्ट लक्षात आली आहे की, अधिकाधिक लसीकरण करणे, हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
असोसिएशनने पुढे म्हटले की, पर्यटन, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव या सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे; पण यांसाठी काही मासांची वाट पहाणे अधिक चांगले ठरेल. सध्या देशात काही पर्यटनस्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होतांना दिसून आले आहे. हे जर असेच चालू राहिले, तर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. वेगाने कोरोना विरोधी लसीकरण आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे.