इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम शिकवण्यास पुरो(अधो)गामी आणि तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी यांनी विरोध केला आहे. एकूण परिस्थिती पहाता नेहमीप्रमाणे या कंपूने कोणताही अभ्यास न करता निवळ हिंदुद्वेषापायी हा विरोध केला आहे, असेच म्हणावे लागेल. ज्योतिष हे वेदांइतकेच प्राचीन शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी दृष्टीही व्यापक हवी. संकुचितपणा आणि द्वेष यांच्या चष्म्यातून पहाणार्यांकडे ती कशी येणार ?
ज्योतिषशास्त्रामध्ये ९ ग्रह आणि २७ नक्षत्रे यांचा व्यापक अभ्यास आहे. व्यक्ती आणि त्याही पुढे राष्ट्राच्या संदर्भात घडणार्या भविष्यातील घडामोडींचा वेध या शास्त्राच्या आधारे घेता येतो. साधना आणि उपासना यांद्वारे अनिष्ट घटनांची तीव्रता काही प्रमाणात न्यून करता येते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र समाजकल्याणासाठी उपयुक्त आहे. ज्योतिषशास्त्र हे गणितावर आधारित आहे. ५ व्या ते ६ व्या शतकात अत्याधुनिक उपकरणे नव्हती. या स्थितीतही आर्यभट्ट आणि वराहमिहीर यांसारख्या भारतीय ऋषिमुनींनी ‘सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर, तसेच अन्य ग्रहांच्या दिशा’ यांविषयीचा अभ्यास गणिताच्या आधारे संपूर्ण जगासमोर मांडला. साधनेच्या बळावर त्यांनी हे साध्य केले. कालांतराने यातीलच काही भाग विदेशी शास्त्रज्ञांच्या नावाने नवीन संशोधन म्हणून थोपवण्यात आले. असे असतांना ऋषिमुनींनी सांगितलेल्या ज्योतिषशास्त्राविषयी आकस का ? याचा अभ्यास करण्याची पुरो(अधो)गाम्यांना जिज्ञासा का नाही ? अर्थात् सोयीस्कर हिंदुद्वेष, हेच याचे उत्तर आहे, हे हिंदू ओळखून आहेत.
ज्योतिषशास्त्र शिकवण्याला विरोध करण्यासाठी तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून ज्योतिषशास्त्राशी संबंधितांनी आणि सूज्ञ नागरिक-विद्यार्थी यांनीही ज्योतिषशास्त्र शिकवण्याच्या समर्थनार्थ मोहीम राबवायला हवी. पूर्वी हा विषय अभ्यासक्रमात घेण्याचे सूत्र आले असता सत्तेत असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारने माघार घेतली. आता मात्र विद्यमान सरकारने हे समाजोपयोगी ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोचेल ? यासाठी प्रयत्न करायला हवेत !
– श्री. जयेश बोरसे, पुणे