धर्मप्रचाराच्या नावाखाली हिंदूंची दिशाभूल करून ख्रिस्त्यांकडून केले जाते धर्मांतर ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

इंदिरा गांधी यांच्या काळात भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) झाल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सरकारवर दबाव आणून धर्माचा प्रचार करण्याची राज्यघटनेत तरतूद करून घेतली. धर्माचा प्रचार करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनरी गरीब, भोळ्याभाबड्या आणि अशिक्षित हिंदूंची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर करतात. रॉबर्ट नेवली या फ्रान्सच्या पाद्र्याने स्वत:चे नाव ‘तत्त्वबोध स्वामी’ असे सांगून ‘हिंदूंच्या चार वेदांच्या पुढे ‘येशू वेद’ हा पाचवा वेद आहे’, असे सांगितले. तसेच ‘ख्रिस्ती क्रिश्न’ ही संकल्पना सांगून हिंदूंची दिशाभूल केली जाते. हे षड्यंत्र असून समाजाने अशा भूलथापांना बळी न पडता हिंदु देवतांवर श्रद्धा ठेवायला हवी.

धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे धर्मांतरित व्यक्तीकडून लिहून घेतले जाते. अशा प्रकारे कायदेशीर स्तरावरही धर्मांतराला संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.