चैन आणि गरज यांतील भेद

प.पू. स्वामी वरदानंद भारती

माणसाला चैन आणि गरज हे दोन्ही शब्द चांगले ठाऊक असतात. त्याचा अर्थही त्याला ठाऊक असतो. म्हणून तो सोयीस्करपणे आपल्या चैनीलाच गरज समजत असतो. चैन आणि गरज यांतील भेद सगळ्यांचा सारख्या प्रमाणात असणार नाही. व्यक्ती व्यक्तीत त्यामध्ये वेगळेपणा संभवेल; पण या बळावर कुणी स्वत:च्या चैनीला गरज समजू लागला, तर ते चालणार नाही. कित्येक वेळा हे न कळत अज्ञानाने होते; कारण मोहक असणे, आकर्षक असणे, हाही अपथ्याचा एक स्वभाव आहे. अजीर्ण होते ते पुरणाच्या पोळीचे, कडुलिंबाच्या पाल्याचे नाही. इंद्रियांचे लाड करण्याची वृत्ती बळावते, त्याचे एक कारण असेही असू शकते की, शृंगार, विलास, रसिकता हे गुण प्रगत समाजामध्ये सुसंस्कृतपणाचे मानले जातात. त्यांच्या स्वीकारामुळे मनुष्याची अभिरुची उच्च आहे, हे सिद्ध होते, असे मानले जाते. या विधानाला माझा विरोध नाही; पण संयम न करणारा मनुष्य रसिक आणि संयम करणारा मनुष्य रुक्ष असतो, असे म्हणणेही मला पटत नाही. – प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘कर्मयोग गीतेचा तिसरा अध्याय’)