‘सनबर्न’सारखे कार्यक्रम राबवण्यासाठी मांद्रे येथे ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रयत्न झाल्यास स्वस्थ बसणार नाही ! – शिवसेना

‘मनोरंजन ग्राम’

मांद्रे – जुनस, मांद्रे येथील नियोजित ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊनच चालू करावा. मनोरंजनाच्या नावाने ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम राबवण्यासाठी ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रयत्न झाल्यास स्वस्थ बसणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेच्या गोवा विभागाच्या शिष्टमंडळाने मांद्रे येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन प्रकल्पाच्या भूमीची पहाणी केली. याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख जितेश कामत यांच्यासह शिवसेनेच्या उपस्थित अन्य कार्यकर्त्यांनी ही चेतावणी गोवा सरकारला दिली आहे.

पहाणीनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळातील सदस्य म्हणाले, ‘‘नियोजित भूमीत स्थानिकांना अंधारात ठेवून कायदेशीर प्रक्रिया न करताच घिसाडघाईने ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने ३०० कोटी रुपये खर्चून मनोरंजन प्रकल्प उभारण्याअगोदर अर्धवट स्थितीत असलेले तुये येथील आरोग्य केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्प, तेरेखोल पूल, ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’ आदी प्रकल्प अगोदर पूर्ण करावेत.’’